सतर्क व्हा! आता रेल्वे प्रवासात 'या' बोगीमध्येही कसून तपासणी; रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय

Railway News: तुम्ही जर निवडणुकीसाठी रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण प्रवासादरम्यान होणाऱ्या गुन्हेगारीवर आळा बसविण्यासाठी रेल्वे पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 18, 2024, 12:42 PM IST
सतर्क व्हा! आता रेल्वे प्रवासात 'या' बोगीमध्येही कसून तपासणी; रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय    title=

Railway News In Marathi: सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. उद्यापासून म्हणजेच 19 एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु होत आहे. याचपार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा दलाने मुंबई ते नागपूर आणि इतर मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या पार्सल बोगीची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूर-मुंबई दुरातों एक्स्प्रेसच्या पार्सल बोगीत 60 लाख रुपयांची रोकड सापडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. 

दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने सीएसएमटी फलाट क्रमांक 17 वर घातपाताच्या अनुषंगाने मेल-एक्स्प्रेस गाड्यांनी येणाऱ्या पार्सलची तपासणी करीत असताना ट्रेन क्रमांक 12290 नागपूर- सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेस या गाडीतून आलेले पार्सल चेक करीत असताना रेल्वे पोलिसांना पार्सल रोख रक्कम सापडल्याचे निदर्शनात आले. या घटनेनंतक त्यांनी सदर पार्सल ताब्यात घेवून रेल्वे सुरक्षा बलाचे कार्यालयात गेले व सदरची माहिती सीएसएमटी रेल्वे पोलिसठाण्यात दिली. त्यानंतर सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी पंचासमक्ष सदरचे पार्सल उघडून पाहिले असता त्यामध्ये एकूण 40 लाख रुपये रोख रक्कम मिळून आली. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

तपासाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस सीएसएमटी स्थानकावर थांबली. त्यानंतर या एक्स्प्रेसच्या डब्यांमधून पार्सल बाहेर काढून पोर्टर्सकडून पार्सल उचलण्याचे काम सुरु झाले. याचवेळी ड्युटीवर असलेले आरपीएफचे जवान प्रत्येक पार्सलचे कसून तपासणी करत होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलीही अनियमित प्रकार घडू नये म्हणून आरपीएफचे जवान सर्कतने काम करत आहे. अशातच एका पार्सल बॉक्सबाबत संशय आला. त्यावर कपड्यांचे पार्सलचे स्टिकर चिकटवले होते. आरपीएफ आणि रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयास्पद पार्सलची तपासणी केली असता त्यात 500 रुपयांच्या नोटा आढळून आल्या, ज्याची मोजणी केली असता ती 40 लाखांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

तसेच पार्सल चेक करीत असताना एक पार्सलमध्ये आणखी 20 लाख रोख रक्कम मिळून आलेली असे 60 लाख रुपयांची रोख रक्कम पंचनाम्या अंतर्गत जप्त करण्यात आलेली आहे. या संदर्भातील पुढील कार्यवाहीसाठी आयकर विभागांकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. मात्र 60 लाख रुपये कोणी कोणाकडे पाठवले याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. 

दरम्यान रेल्वेच्या सामानाला पार्सल कोड दिला जातो, त्यानुसार आता रेल्वे पोलिसांचा तपास सुरु आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात आचारसंहिता लागू आहे. या कालावधीत अतिरिक्त रोकड घेऊन जाणे शक्य नसतानाही एवढी रोकड कोणी आणि कोणाकडे पाठवली याचा तपास पोलिस करत आहेत. मात्र आता या घटनेनंतर रेल्वे सुरक्षा दलाकडून मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधील पार्सल बोगीची तपासणी वाढविणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.