नागपूर : दुर्गम आणि अति उंच भागात असलेल्या महापारेषणच्या अति उच्चदाबाच्या यंत्रणेची देखभाल आणि दुरुस्ती करणे अनेकदा अवघड आणि कठिण असते. मात्र आता यावर उपाय शोधण्यात आलाय..महापारेषण ड्रोनच्या साहाय्याने अति उच्च दाब वाहिन्यांची निगा राखण्याचे व देखभाल दुरुस्तीची कामे अचूक व जलदगतीने करणार आहे. वीज क्षेत्रात ड्रोनचा वापर करणारी महापारेषण सध्या देशातील एकमेव कंपनी ठरणार असल्याचा दावा उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केलाय.
महापारेषण आपल्या अति उच्च दाब वाहिन्यांची देखभाल जसे ग्राऊंड पेट्रोलिंग, टॉवर टॉप पेट्रोलिंग, सर्व्हे आदी कामे ड्रोनव्दारे करणार असून यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागाने परवानगी दिली आहे. यामुळे महापारेषणचा वेळ, पैसा व मनुष्यबळाची बचत होणार आहे. शिक्षित चमुद्वारे ड्रोनचा कुशल प्रकारे वापर करण्यात येत आहे.
विशेषतः दुर्गम भागातून जाणाऱ्या, समुद्रकिनारी व खाडीलगतच्या भागात पारेषण वाहिन्यांची कामे करताना ड्रोनचा उपयोग चांगल्या रीतीने होणार आहे. ड्रोनवर व्हिडिओ कॅमेरा आणि थर्मोव्हिजन कॅमेरा लावला असल्यामुळे पारेषण
वाहिन्यांवर निर्माण होणारे विविध दोष त्वरित निदर्शनास आणून त्यांची तात्काळ दुरूस्ती करणे शक्य झाले आहे.
विशेषतः नवीन प्रकल्पाचे सर्व्हेक्षण करण्यासाठीही या ड्रोन कॅमेराचा उपयोग होणार आहे. टॉवरच्या अगदी जवळ जाऊन ड्रोनव्दारे तपासणी होत आहे. त्यामुळे हे डायग्नोस्टिक टूल ठरले आहे. तसेच कार्यालयात बसून ड्रोनची हालचाल पाहणेही शक्य झाले आहे. नियमानुसार ड्रोन उडविण्याची उंची 50 मीटरपर्यंत आहे.
महापारेषण वाहिन्यांची देखभालीची कामे आता ड्रोनव्दारे...