दुष्काळाचा आणखी एक बळी; पाणी भरण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा चक्कर येऊन मृत्यू

भर उन्हात पाणी भरत असताना ते चक्कर येऊन खाली पडले

Updated: May 14, 2019, 06:37 PM IST
दुष्काळाचा आणखी एक बळी; पाणी भरण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा चक्कर येऊन मृत्यू title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर: दुष्काळाच्या तावडीत सापडलेल्या लातूर जिल्ह्यात पाणी टंचाईमुळे आणखी एक बळी गेला आहे. निलंगा येथील ६० वर्षीय वृद्ध पाणी भरण्यासाठी गेल्यानंतर चक्कर येऊन पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. महेबूबपाशा अब्दुल करीम सौदागर असे त्या वृद्धाचे नाव आहे. दरम्यान या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी निलंगा नगर पालिकेत जाऊन ठिय्या आंदोलन केले. तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून रोष व्यक्त केला. 

लातूर जिल्ह्यातील तीव्र पाणी टंचाईमुळे औसा तालुक्यातील आलमला येथे एकाच कुटुंबातील तिघा जणांचा बळी गेल्याची घटना २९ एप्रिल रोजी घडली होती. त्यानंतर आता जिल्ह्यात आणखी एक पाणी बळी जिल्ह्यात गेलाय. फुलारी गल्लीतील महेबूबपाशा अब्दुल करीम सौदागर यांच्या घराजवळील बोअर एका महिन्यापासून बंद होता. त्यामुळे घरापासून लांब असलेल्या नगर पालिकेच्या दुसऱ्या बोअरवेल मधून ते पाणी भरत होते. भर उन्हात पाणी भरत असताना ते चक्कर येऊन खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. पाण्यामुळेच आपल्या वडिलांचा बळी गेल्याचा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे.

निलंगा नगर पालिका हे पूर्णपणे भाजपच्या ताब्यात असताना ते जनतेला पाणी देण्यात कमी पडल्याचा आरोप स्थानिक काँग्रेस नेते करीत आहेत. त्यामुळे या मृत्यूला पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे ही जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

एकूणच या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पाणी देण्यात कमी पडलेल्या निलंगा नगर परिषदेला जबाबदार धरीत ठिय्या आंदोलन केले. तसेच यावेळी मुख्याधिकारी गैरहजर असल्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेधही व्यक्त केला. लातूर जिल्ह्यातील हा चौथा पाणी बळी असून पाणी टंचाईवर कडक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.