योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर गर्भगृहातलं पहाटेचं दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.
जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं त्र्यंबकेश्वराच्या या मंदिराच्या गर्भगृहात महादेव, विष्णू आणि ब्रह्मा अशा तिन्ही देवांची प्रतिकं त्रिपिंडीच्या स्वरुपात आहेत. देशातली ही एकमेव अशी महादेवाची पिंडी आहे, ज्यामध्ये शिवलिंग नाही. म्हणूनच महाशिवरात्रीला या पिंडीचं दर्शन घेण्याची भाविकांची चढाओढ लागते.
विशेषतः पहाटे एक ते दोन तासात हजारो भाविक याठिकाणी जमतात. त्यातून चेंगराचेंगरी होण्याची भीती असते. तसंच या छोट्याशा गर्भगृहात भाविक गुदमरु शकतात. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून गर्भगृह दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक ग्रामीण पोलिसांनी घेतला आहे.
मात्र पोलिसांच्या निर्णयामुळे भाविकांमध्ये नाराजीचं पसरली आहे.
यंदाच्या महाशिवरात्रीला एक लाखाहून अधिक भाविक त्रंबकेश्वरला भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ महादेव मंदिरातच नव्हे, तर त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये सुद्धा जनसमुदाय लोटणार आहे. नुकताच एका भाविकाचा दर्शन रांगेत मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि देवस्थानने योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे.
नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर मंदिरात श्रीदेवी सिंग यादव हा भाविक आला होता. तो दिल्लीतल्या नोएडा येथील राहणारा होता. यादव त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिरात दर्शनाच्या रांगेत उभा असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. मात्र त्याक्षणी उपचार, पाणीही त्यांना मिळू शकलेलं नाही. त्यानंतर अर्धा ते पाऊण तासांनी त्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.