एक डोस कोवॅक्सीनचा तर दुसरा कोविशिल्डचा; 72 वर्षीय आजोबांना तीव्र ताप आणि अंगावर उठले पुरळ

लसीकरणाच्या मानवीय चूका जीवावरही बेतू शकतात

Updated: May 9, 2021, 01:50 PM IST
एक डोस कोवॅक्सीनचा तर दुसरा कोविशिल्डचा; 72 वर्षीय आजोबांना तीव्र ताप आणि अंगावर उठले पुरळ

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे. परंतु लसीकरणाच्या मानवीय चूका जीवावरही बेतू शकतात. जालना जिल्ह्यातील परतूरच्या श्रीष्टी खांडवी येथील एका 72 वर्षीय व्यक्तीने लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर तीव्र ताप, पुरळ अशक्तपणा, ऍलर्जी आणि रिअॅक्शन झाल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीला पहिला डोस कोवॅक्सीन तर दुसरा डोस कोविशिल्डचा देण्यात आला अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

श्रीष्टी येथील आरोग्य केंद्रात 72 वर्षीय दत्तात्रय वाघमारे यांच्याबाबत लसीकरणादरम्यान धक्कादायक प्रकार घडला आहे. 22 रोजी त्यांनी कोवॅक्सीनचा पहिला डोस घेतला होता. 19 एप्रिल ते 3 मे दरम्यान रोजी दुसरा डोस घ्यावा असं प्रमाणपत्रावर नमूद केलं होतं. 

वाघमारे यांनी 30 एप्रिल रोजी लसीचा दुसरा डोस घेतला. परंतु यावेळी आरोग्य केंद्रावर त्यांना कोविशिल्ड लसीचा डोस  देण्यात आला. दोन दिवसांनंतर वाघमारे यांना लसीचा त्रास व्हायला सुरूवात झाली. त्यांना झालेल्या रिअॅक्शनमुळे कुटूंबिय घाबरले. तातडीने त्यांनी त्यांच्या वर उपचार घेतले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय.

लसीच्या दोन्ही डोसबाबत सविस्तर माहिती घेऊन सदर प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना जालना लसीकरण अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत