अमर काणे, झी मिडिया, नागपूर : पालकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी. तुमची लहान मुलं स्मार्टफोन वापरत असतील तर काळजी घ्या. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे लहान मुलांवर विपरीत परिणाम होतोय. एका संस्थेनं याबाबत धक्कादायक अहवाल दिलाय.
स्मार्ट फोन आता मोठ्यांप्रमाणे छोट्यांच्या जीवनाचाही अविभाज्य भाग बनलाय. एका आकडेवारीनुसार देशात तब्बल 37 टक्के लहान मुलं स्मार्ट फोनचा वापर करतात. मात्र हाच स्मार्ट फोन मुलांसाठी घातक ठरू लागलाय. भारत सरकारच्या एनसीपीसीआर विभागानं स्मार्ट फोनच्या वापराबाबत एक धक्कादायक अहवाल दिलाय.
या अहवालात स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे लहान मुलांची एकाग्रता भंग पावत असल्याचं म्हंटलं आहे. देशातील 23.80 टक्के लहान मुलं झोपण्यापूर्वी बराच वेळ स्मार्टफोनवर घालवतात. मुलांच्या मानसिकतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो असं या अहवालात म्हंटलं आहे.
स्मार्टफोन ही काळाची गरज असली तरी त्याचा वापर किती करावा यालाही मर्यादा आहे. स्मार्टफोनमुळे लहान मुलांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. त्यात आता या अहवालामुळे पालकांच्या चिंतेत आणखीन भर घातलीय.