सांगली : माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यसह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. त्याचप्रमाणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, असे राज्यातले सर्वपक्षीय नेते हजर होते. सोनहिरा साखर कारखान्याच्या परिसरात पतंगराव कदम अनंततात विलीन झाले.
काल रात्री पतंगराव कदमांनी मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते 74 वर्षाचे होते. रात्री त्यांचं पार्थिव पुण्याला नेण्यात आलं. तिथे आज सकाळपासून अनेक नेत्यांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. त्यात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह अनेक नेत्यांनी त्याचं दर्शन घेतलं.
राजकारणातं मोकळं ढाकळं व्यक्तीमत्व म्हणून सर्वपरिचीत पतंगरावांनी आयुष्यभर वंचितांच्या शिक्षणासाठी काम केलं. त्यातून भारती विद्यापीठासारखं मोठं जाळं उभं केलं. सांगली आणि परिसरातल्या शेकडो तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आज त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सांगलीच्या पंचक्रोशीतले हजारो लोक वांगीच्या सोनहिरा कारखान्याच्या परिसरात उपस्थित होते.