प्रीतम मुंडेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य, पिंपरीत शिक्षकाला मारहाण

खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं, म्हणून एका शिक्षकाला मुंडे समर्थकांनी मारहाण केल्याची घटना पिंपरीमध्ये घडली आहे. 

Updated: Sep 9, 2018, 07:30 PM IST
प्रीतम मुंडेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य, पिंपरीत शिक्षकाला मारहाण

पिंपरी : खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं, म्हणून एका शिक्षकाला मुंडे समर्थकांनी मारहाण केल्याची घटना पिंपरीमध्ये घडली आहे. भाजप आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्याबाबत टीका करताना कुऱ्हाडे यांनी सोशल मीडियावर प्रीतम मुंडेंच्या विरोधात कमेंट केली होती. यामुळे चिडलेल्या पंकजा मुंडेंचे समर्थक कुऱ्हाडे यांच्या घरी गेले. दमदाटी करून त्यांना माफी मागायला लावली. मात्र माफीनंही त्यांचं समाधान झालं नाही. शिवीगाळ करत त्यांनी कुऱ्हाडेंना मारहाण देखील केली आहे.

याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या सगळ्या प्रकाराला आक्षेप घेतलाय. महाराष्ट्रात मोगलाई अवतरली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. मारहाण करणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.