कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. हा विवाह सोहळा म्हणजे समाजातल्या बुरसटलेल्या रूढी परंपराना छेद देणारा ऐतिहासिक विवाह ठरला. कंजारभाट समाजातल्या काही तरूण तरूणींनी आता कौमार्य चाचणीविरोधात आवाज उठवला आहे. स्टॉप द व्ही रिच्युअल नावाने ही चळवळ चालवली जाते. कंजारभाट समाजात या कुप्रथेविरोधात आवाज उठवणाऱ्या तरूण तरूणीचं लग्न झालं.
समाजातल्या बुरसटलेल्या रूढींना विरोध करत विवेक तमायचीकर आणि ऐश्वर्या भाट यांनी विवाह केला. याआधी या बोगस प्रथांना विरोध करणाऱ्या समाजातल्या तरूण तरूणींना एका लग्नात मारहाण झाली होती. समाजाविरूद्ध काम केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असंही त्यांना धमकावण्यात आलं होतं. मात्र या सर्व परिणामांना दूर सारत विवेक आणि ऐश्वर्या यांनी विवाह केला.
एका लग्नात कौमार्यचाचणी झाली नाही म्हणून लगेच ही प्रथा बंद पडणार नाही. पण या तरूण तरूणीने धाडस दाखवत ही प्रथा बंद पाडण्याच्या दृष्टीने टाकलेलं हे पहिलं पाऊल निश्चितच आहे.