पिंपरी चिंचवड परगण्यात 'राम-लक्ष्मणा'मध्ये 'कट्टी' 

कानमंत्र देण्यासाठी सम्राट देव'इंद्र' परगण्यात आले होते. 

Updated: Nov 26, 2020, 06:17 PM IST
पिंपरी चिंचवड परगण्यात 'राम-लक्ष्मणा'मध्ये 'कट्टी' 
संग्रहित छायाचित्र

कैलास पुरी, पिंपरी चिंचवड : काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड परगण्यातील राम अर्थात महेश आणि राजे लक्ष्मण यांच्यातील कथित शीत युद्ध संपल्याचं चित्र निर्माण झाले. परगण्यातील कमळ प्रेमींनी नि:श्वास सोडला. राम आणि लक्ष्मण एकदिलाने परगण्याच्या आणि कमळ विस्तारासाठी झटत असल्याची आभासी का होईना जाणीव कमळप्रेमींमध्ये होती. मात्र ही जाणीव अभासीच होती हे पुन्हा सिद्ध झालं. 

पुणे पदवीधर रणसंग्रामात आपलाच उमेदवार चांगला आहे आणि रणसंग्राम जिंकायचा आहे याचा कानमंत्र देण्यासाठी सम्राट देव'इंद्र' परगण्यात आले होते. त्यांनी कानमंत्र ही चांगला दिला. परंतू याच अनुपम सोहळ्यात काही जणांच्या नजरेतून एक गोष्ट चुकली नाही.. ती म्हणजे राजे राम अर्थात महेश आणि राजे लक्ष्मण यांच्यातील अबोला.

खरं तर काही दिवसांपूर्वी उद्विग्न होत रामाने पिंपरी चिंचवड परगण्याच्या कमळ प्रमुख पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. कोथरूडहुन समेट घडल्यामुळं रामाने एक पाऊल मागे टाकले होते. परत एकदा राम लक्ष्मणाचा वारू चौफेर उधळेल असे कमळप्रेमींना वाटत होते. मात्र त्यांचा हा विश्वास काही दिवसातच मावळला. अगदी सम्राट देव"इंद्र' यांच्या परगण्यातील सोहळ्यात राम लक्ष्मण वेगवेगळ्या दिशेने तोंड करून होते. 

दोन तीनदा अगदी मंचावर दोघे एकमेकांसमोर आले तरी साधी नजरा नजर करण्याच सौजन्य ही दोघांनी दाखवलं नाही. अर्थात ही गोष्ट चाणाक्ष कमळप्रेमींच्या नजरेतून जशी सुटली नाही तशी ती इतरांच्याही नजरेतून सुटली नाही. 
खरंतर दोन तुल्यबळ योध्ये असल्यानंतर त्यांच्यात संघर्ष अटळ असतो. तसा तो राम  लक्ष्मणात होणार हे ही अटळच. परंतु गोष्ट अबोल्यापर्यंत जाईल याचा विचार कोणी स्वप्नात ही न केलेला. पण कल्पना आणि वास्तव यात खूप अंतर असते हे कमळप्रेमींना उशिरा लक्षात आले. ज्या राम आणि लक्ष्मण जोडीने पिंपरी चिंचवड परगण्यावर कमळाचं साम्राज्य निर्माण केलं तेच राम लक्ष्मण आज बोलत नाहीत ही गोष्टच कोणी स्वीकारू शकत नसले तरी ते वास्तव आहे. अर्थात या पूर्वी ही परगण्यातील काही निवडीवरून या दोघांमध्ये संघर्ष झाला होता मात्र आताच मामला थोडा वेगळा आहे. 

राजे लक्ष्मण यांनी चिंचवड बालेकिल्ला अबाधित ठेवला असला तरी चिंचवड च्या रणसंग्रामात त्यांना शत्रूला नामोहरम करण्यात अपयश आले. शत्रू हरला असला तरी विजयापेक्षा   शत्रूने दिलेल्या कडव्या लढतीचीच चर्चा अधिक झाली. त्याचे शल्य लक्ष्मणाला अजून ही होतंय. त्यामुळे शत्रूला परत तशी लढत देण्यास लायकचं ठेवायचे नाही असा प्रयत्न लक्ष्मण गेली कित्येक दिवस करतो आहे. परंतू असे असताना परगण्याच्या तिजोरीच्या चाव्या राजे राम यांच्या शिलेदारांच्या हातात असल्याने त्यांच्या या प्रयत्नांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अडथळा होतोय. 

चिंचवड प्रांतातील शत्रू पक्षाच्या वाकड मध्ये निधी देणे आणि विकासरूपी गंगा वाहण्यासाठी तिजोरी प्रमुखाने सढळ हाताने मदत केली असल्याचे लक्ष्मणाच्या लक्षात आले आणि राजे राम यांच्यावर त्यांची खप्पा मर्जी झाल्याची अंतस्थ गोटातून परगण्यातल्या कमळप्रेमींना कळत आहे. आता कारण काही ही असले तरी दोघांचा अबोला कमळप्रेमींसाठी मात्र धक्का आहे हा धक्का पचवायचा कसा या विचाराने निष्ठावान कमळप्रेमी निराश झाले तर तिकडे देव"इंद्र' यांचा पदवीधर सोहळा चांगला होऊन ही पदरी निराशा आल्याने राजे राम उद्विग्न झाले आणि पिंपरी चिंचवड परगण्याच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा काळे ढग जमा झाले...!(पिंपरी चिंचवड शहरातील दोन दिग्गज नेत्यांच्या 'कट्टी' वर आधारित)जाता जाता देव'इंद्र' यांच्या पदवीधर सोहळ्यात राजे राम आणि राजे लक्ष्मण यांचा अबोला दिसत असला तरी या कार्यक्रमात कमळ प्रांताचे तीन पदाधिकारी मात्र चांगलेच खुश दिसत होते. 

 

सोहळ्याचे सूत्र संचालन मोर'ईश्वर' याने केले, प्रास्तविक अन'मोल' याने केले तर पदवीधर रणसंग्रामात योध्याची ओळख दुर्ग'राजू' याने करून दिली. पुणे पदवीधर रणसंग्रामात आम्ही कसे काम केले या तिघांनी सम्राट देव'इंद्र' यांना पटवून देण्यात कसलीही कासर ठेवली नाही. त्यांच्या साठी मात्र हा सोहळा मी, माझा, मी परत माझा आणि मी मी मी मी असा झाला आणि महिनाभर केलेल्या कष्टाचं चीज झाल्याचं समाधान त्यांनी अनुभवले पण त्याच्या वाढलेल्या प्रस्थाने अनेकजण मात्र घायाळ झाले..!