वाल्मिक जोशी, झी 24 तास, जळगाव : शहरात काही दिवसांपूर्वी पोलिस मुख्यालयातून महिला कर्मचाऱ्याच्या नावांनी पत्रकार आणि पोलिसांनाही अश्लील मेसेज पाठवले गेले होते. या सर्व प्रकरणाची सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर प्रकरणाचा सायबर सेलने छडा लावला आहे. महिला कर्मचाऱ्याच्या नावाने अश्लील मेसेज करणारा दुसरा तिसरा कोणी नसून पोलीस कर्मचारीच असल्याचं निष्पन्न झालं आहे. हा पोलीस कर्मचारी मुख्यालयातच कार्यरत होता. पोलिसांनी या विकृताला ताब्यात घेतलं आहे. नरेंद्र लोटन पाटील (वारुळे) असं या पोलीसाचं नाव आहे. (Police arrest Narendra Patil for sending obscene messages in the name of women police in jalgaon)
नक्की काय घडलं?
हा विकृत पोलीस कर्मचारी सहकारी महिला कर्मचाऱ्याच्या नावाने मुख्यालयातील अधिकाऱ्यांना तसेच पत्रकारांना अश्लिल मेसेजे करायचा. यासर्व प्रकाराबाबत त्या संबंधित महिला कर्मचाऱ्याला समजलं. त्यानुसार महिला कर्मचाऱ्याने सायबर सेलमध्ये 4 ऑगस्टला तक्रार दिली. मिळालेल्या तक्रारीनुसार पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी तपास करण्याचा सूचना केल्या. तपासाला आणखी वेग आला. पोलिसांना चौकशी दरम्यान या विकृताला ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार या व्यक्तीचं लोकेशन नाशिक दाखवलं. त्यानुसार या नरेंद्र पाटीलला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अगंद नेमाने यांनी दिली.
दरम्यान शहरात काही दिवसांपूर्वी पोलिसांचा गुन्हेगारांसोबत नाचतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यात आता पोलीस दलातील कर्मचाऱ्यानेच असा प्रकार केला. त्यामुळे पोलिसांची मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे. तसेच टीकाही केली जात आहे. ज्यांच्या खांद्यावर जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते, तेच जर अशा प्रकारे वागू लागले, तर सर्वसामांन्यांनी कोणावर विश्वास ठेवावा, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.