पोलीस कर्मच्याऱ्याने केली रेल्वे ट्रॅक वर आत्महत्या

नाशिकच्या ओढा जवळ असलेल्या रेल्वे ट्रॅकवर केली आत्महत्या 

Updated: Feb 25, 2022, 05:02 PM IST
पोलीस कर्मच्याऱ्याने केली रेल्वे ट्रॅक वर आत्महत्या  title=

नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात हजेरी मास्तर म्हणून कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने ओढा येथे रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनिल तानाजी जमदाडे ( ब नं १०९३) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. अनिल जमदाडे यांच्या आत्महत्येचं कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. 

जमदाडे हे मुळचे दिंडोरी तालुक्यातिल मातेरेवाडी येथील रहिवाशी आहेत. सध्या ते रासबिहारि लिंकरोड परिसरात स्थायिक आहेत. १ जून १९९१ ला पोलिस दलात भरती झाले होते. जमदाडे म्हसरूळ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची पंचवटी पोलीस ठाण्यात बदली झाली होती. ते सध्या पंचवटी पोलीस ठाण्यात हजेरी मास्तर म्हणून कार्यरत होते. 

मिळालेल्या माहिती नुसार, गुरुवार दि. 24 फेब्रुवारी रोजी जमदाडे पंचवटी पोलीस ठाण्यातून काम करून घरी निघाले होते. घरी न जाता त्यांनी रासबिहारी लिंक रोड वरील माने नगर येथील त्यांच्या घराजवळील  ओळखीच्या सलूनच्या दुकानाजवळ स्वतःची मोटार सायकल लावली. काही वेळाने माझा मुलगा गाडी घेऊन जाईल असे सलूनच्या मालकाला सांगून जमदाडे तेथून निघून गेले. 

दुपारच्या सुमारास एका पोलीस कर्मचाऱ्याने ओढा येथे रेल्वे खाली आत्महत्या केल्याची माहिती आडगाव पोलीस स्टेशनला मिळाली.  माहिती मिळताच पोलीस ठाण्यातील पथक घटना स्थळी रवाना झाले. मयताची माहिती घेतली असता मयत पंचवटी पोलीस ठाण्यातील कर्मचारी असल्याचं समोर आलं. त्यांच्या आत्महत्येने पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.