अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : (Political News) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कल्याणमधील गोळीबार प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, विरोधकांकडून या घटनेला भाजप आणि शिंदे गटातील गँगवॉर म्हणून नाव दिलं असलं तरीही प्रत्यक्षात मात्र शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये मात्र कोणतीही वर्चस्वाची स्पर्धा नसल्याचं स्पष्ट करत बावनकुळे यांनी शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं.
कल्याण पूर्वमधील भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर त्यांनी वक्तव्य करताना अशा एखाद्या घटनेनं महायुतीत फरक पडणार नसल्याचं स्पष्ट केलं. सदर घटनेची सखोल चौकशी गृहखातं करत असून, अशा अनेक घटना याआधी हजारदा घडल्या आहेत, पण त्या घटनांच्या धर्तीवर सध्या घडलेल्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करताच येणार नाही असं म्हणताना हे महाराष्ट्राचे संस्कार नाहीत अशी भूमिका त्यांनी मांडली.
एकिकडे कल्याणमधील घटनेबाबत बोलत असतानाच दुसरीकडे बावनकुळे यांनी कोकण दौऱ्यावर असणाऱ्या आणि या दौऱ्यादरम्यान जनतेला संबोधित करत असलाना पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकेची झोड उठवली.
'उद्धव ठाकरे बावचळले असून, त्यांच्यासह आता मविआ घाबरली आहे. कारण, त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भोपळाही फोडता येणार नाहीये हे त्यांच्या लक्षात आलं आहे. मविआ आता पत्त्यासारखी पडणार आहे', अशा शब्दांत बावनकुळे यांनी खरमरीत टीका केली. लोकसभाच्या जागा वाटपावरही बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. महायुती लवकरच आपल्या जागा जाहीर करेल, तर 51 टक्के जागा मिळणार असून अमरावती लोकसभाची जागा महायुतीचाच उमेदवार 51 टक्के मते घेऊन जिंकणार असं म्हणताना विदर्भात एकही जागा काँग्रेसला मिळणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र आणि विदर्भात मविआला एकही जागा मिळणार नाही, या वक्तव्यावर त्यांनी यावेळी जोर दिला.