बीड : 'ज्या ठिकाणी पूजा चव्हाण हिने आपला पोल्ट्री व्यवसाय सुरू केला होता त्याच ठिकाणी आता तिचं स्मारक करण्यात येणार असल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे. आज पूजाचा दशक्रिया विधी झाला. यावेळी तिचे सर्व नातेवाईक उपस्थित होते. आपल्या मुलींच्या आठवणीचं काहीतरी स्मारक असावं.' अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
'पूजा ही स्वाभिमानी मुलगी होती. तिचा आम्हाला अभिमान आहे. तिच्या निधनाने आम्हाला दुःख झाला आहे. मात्र ज्या ठिकाणी तिने व्यवसाय सुरू केला त्या ठिकाणी आता स्मारक करण्याची आमची इच्छा आहे. या प्रकरणामध्ये सर्वांनी चर्चा थांबाव्यात तसेच पोलीस तपास करत आहे. पोलीस तपासातून सर्व काही बाहेर पडेल.' असंही पूजाचे वडील म्हणाले.
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी रोज नवनवे तर्कवितर्क काढले जात आहेत. मात्र अद्यापही या प्रकरणात काही स्पष्ट समोर आलेलं नाही. मृत्यू प्रकरणातील तपासासाठी पुण्यातील वानवाडी पोलीस ठाण्याचं पथकं सध्या यवतमाळमध्ये आहे. यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात पूजावर उपचार करण्यात आल्याची माहिती वाणवाडी पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने वानवाडी पोलिसांनी यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांना एक पत्र दिलं. याबाबत विचारणा केली असता, पत्राबाबतची माहिती गोपनीय असून सांगू शकत नसल्याची प्रतिक्रिया डॉ कांबळे यांनी दिली. मात्र पूजा चव्हाण नावाची रुग्ण भरती नसल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण आता अधिक गुंतागुंतीचं होत चाललं आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. त्यातील एक जण हा अरुण राठोडच्या जवळील आहे. अरुण राठोड या प्रकरणात फरार असल्यानं त्याच्या मागावर पुणे पोलीस आहेत. पुणे पोलिसांच्या चौकशी पथकाने ही कारवाई केली असली तरी त्याला पोलीस अधिकाऱ्यांकडून दुजोरा दिला जात नाहीये.