Poshir Dam Project: ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या काही भागात पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी कर्जत तालुक्यातील पोशीर धरणाचे काम प्रगतीपथावर आहे. या धरणामुळं ठाणे जिल्ह्याला नवीन जलस्त्रोत मिळणार आहे. अलीकडेच पोशीर धरणाला जलस्त्रोत खात्याकडून शाश्वत पाणी साठ्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. पोशीर धरणामुळं ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांची पाण्याची सोय होणार आहे.
वाढती लोकसंख्या आणि बांधकाम यामुळं पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन राज्य शासनाने पोशीर धरणाची गरज व्यक्त केली होती. त्यासाठी 15 वर्षापूर्वी राज्य शासनाने जलतज्ज्ञ डॉ माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. पोशीर धरणासाठीच्या आवश्यक मंजुरी घेऊन 2016मध्ये काम सुरु करण्यात आले होते. हे धरण 2030 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. पोशीर धरण हे उल्हास खोऱ्यातील कर्जत तालुक्यात येते. चाई, बोरगाव, पेंडरीव, बोरशेत, चेवणे, उंबरखांड, भोपाळी येथे भूसंपादन करण्यात येणार आहे. तसंच, या धरणार 355 दलघमी इतका पाणीसाठा राहणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरांना बदलापूर जवळील बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या व्यतिरिक्त ठाणे जिल्ह्याला कोणतीही पर्यायी जलस्रोत नाही., त्यामुळे उल्हास नदीची उपनदी असलेल्या कर्जत तालुक्यातील पोशिर धरण झाल्यास ठाणे जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न मिटणारच आहे. तसेच या धोरणामुळे उल्हास खोऱ्यातून येणार पाणी अडल्यास बदलापूर परिसराला भेडसावणारा पुराचा धोकाही टळणार आहे. पोशीर ही रायगड जिल्ह्यातील उल्हास खोऱ्यातून कर्जत तालुक्यातून वाहणारी उल्हास नदीची उपनदी आहे. ही नदी नेरळ, वांगणी, बदलापूर भागातून वाहते.
पोशिर धरणाला राज्याच्या जलस्त्रोत विभागाकडून शास्वत पाणी साठ्याचे प्रमाणपत्र मिळाल्याने पोशिर धरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. पोशिर धरण हे ठाणे जिल्ह्यासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचं मत माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी सांगितलं आहे.