मुंबई : राज्याच्या काही भागात आजपासून लोडशेडींग होणार आहे. मुंबईला मात्र या लोडशेडींगमधून वगळण्यात आलंय. एमएसईडीसीएलने हे लोडशेडींग जाहीर केलंय. रोज दोन तास लोडशेडिंग होणार आहे. राज्यातल्या महावितरणच्या जवळपास तीन कोटी ग्राहकांना लोडशेडींगचा शॉक बसलाय. विदर्भ, मराठवाडा, खानदेशात लोडशेडिंग होईल. मुंबईत भांडुप, मुलुंड, ठाणे, नवी मुंबई या शहरांमध्ये लोडशेडिंग होणार नाही. राज्यात अडीच ते तीन हजार मेगावॅटचा तुटवडा आहे. सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 6 ते 10 या कालावधीत जपून वीज वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय.
वीज दरवाढीचाही शॉक
वीज दरवाढीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलीये. उष्णता वाढतेय त्यामुळे वीज मागणी वाढली आहे. मात्र बाजारात खरेदी करायला वीजच नाही, याकडे राऊत यांनी म्हटलंय.
शेतकऱ्यानेच पिकाला लावली आग
येवला तालुक्यातील ठाणगाव इथे एका तरुण शेतकऱ्याने दीड एकर कांदा पीक आग लावून जाळून टाकत नांगर फिरवला. वीज नसल्याने कांदा पीकाला पाणी देता येत नव्हतं. त्यात उन्हाचा तडाका वाढल्याने कांदा पीक वाळू लागलं होतं. अखेर संतप्त होत या शेतक-याने हे पाऊल उचललं.
सौरऊर्जेसाठी वापरल्या जाणाऱ्या सौरपटलाचा वस्तू आणि सेवा कर पाच टक्क्यांहून 12 टक्क्यांवर नेण्यात आला आहे. आता पाच टक्क्यांवरील सीमा शुल्कही केंद्र सरकारने एप्रिलपासून 40 टक्क्यापर्यंत वाढवलं आहे. त्यामुळे राज्यातील सौरऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पांना खीळ लागण्याची शक्यता आहे.