विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण : कल्याण पूर्वेतील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 'प्रबोधनकार ठाकरे' या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याने एकच शिक्षक दोन वर्गांना शिकवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शिक्षकांनी आता वेतन मिळत नसल्याने शिकवण्यास नकार दिलाय. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय. इंग्रजी शाळा खासगी संस्थेला चालवण्यासाठी देण्याची चर्चा सुरू आहे.
कल्याण पूर्वेच्या नेतीवली परिसरातल महापालिकेची प्रबोधनकार ठाकरे शाळा आहे. या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यमांचे वर्ग चालतात. या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत एकूण ३२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी ९ शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांना सहा सहा महिने पगार मिळत नसल्याने ते नाराज झालेत. शिक्षिका वेळेत शाळेत येत नाहीत, योग्य शिकवत नाहीत असा आरोप पालकांनी केलाय.
शिक्षण मंडळ सभापती वैजयंती घोलप यांनी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही असं आश्वासन पालकांना दिलंय. पालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा गेल्या १० वर्षांपासून चालवली जात आहे. मात्र अजून त्याला शासन मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे ही शाळा बंद करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र ही शाळा पालिकेच्या अटी-शर्तींवर चालवण्यासाठी काही खासगी संस्थांनी रस दाखवला आहे.
महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाशी हलगर्जी होत असेल तर त्याची तातडीने दखल घेणं गरजेचं आहे. पण त्याचसोबत शिक्षकांच्या समस्या सोडवणंही गरजेच आहे.