नाशिक : सध्या इंधन बचत आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून सायकल चालविण्याकडे सर्वांचाच कल दिसून येत आहे. असाच संदेश देण्यासाठी नाशिक जिल्ह्यामधल्या येवला तालुक्यातील एका नवरदेवाने आपल्या वधूसह चक्क सायकलवरून वरात काढली. येवल्याच्या नांदेसरमधल्या प्रशांत वाघ या जवानानं इंधन बचत आणि पर्यावरण रक्षणासाठी अनोखा निर्णय घेतला. लग्नानंतर त्यांनी आपल्या नववधूला नांदेसर ते आडगाव चोथवा असा सायकलवरून प्रवास केला.
येवला तालुक्यातील नांदेसर येथील रहिवासी व सध्या सैन्यदलात कार्यरत असलेल्या प्रशांत वाघ या जवानाने त्याचे लग्नानंतर त्याचे नववधूला नांदेसर ते आडगाव चोथवा असा प्रवास करून सायकल वरून आपल्या घरी नेले. इंधनाची बचत व्हावी तसेच पर्यावरणाचा ऱ्हास व्हावा यासाठी पिंपळगाव जलाल येथील जय भवानी मित्र मंडळाचे वतीने सायकल रॅली द्वारे अनेक उपक्रम राबविले जातात. या मंडळातील एक सदस्य असलेल्या या जवानाने आपल्या लग्नानंतर सायकल चे असलेले फायदे हे लोकांपुढे जावे यासाठी हा निर्णय घेतलाय.
पतीच्या पर्यावरणपूरक निर्णयाला नववधू ज्योती भोर यांनीही पाठींबा देत पाठवणीवेळी आगळा वेगळा खंबीरपणाचा निर्णय घेतलाय. लग्नानंतर सासरी सायकलवरुन जाण्याच्या निर्णयावर त्या आनंदी आहेत. दैनंदिन आयुष्यातील एका छोट्याश्या उदाहरणातून समाज परिवर्तनाचे मोठे काम साध्य करता येऊ शकते हे उदाहरण या सायकल वरातीने दाखवून दिले आहे.