आता सुवर्ण संधी! आता विकास नाही करणार तर कधी करणार? प्रवीण दरेकर यांचा शिवसेनेला सवाल

'युतीचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीच्या विकासात स्वतः लक्ष घातलं होतं. पण आता विकासाची गती मंदावली आहे'

Updated: Jul 11, 2021, 08:39 PM IST
आता सुवर्ण संधी! आता विकास नाही करणार तर कधी करणार? प्रवीण दरेकर यांचा शिवसेनेला सवाल  title=

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील रखडलेल्या विकास प्रकल्पांवरुन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. युतीचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कल्याण डोंबिवलीत स्वतः लक्ष घातलं होतं. पण आता शहरात विकासाची गती मंदावली आहे. 

कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ता शिवसेनेची, खासदार, पालकमंत्री, नगरविकासमंत्री, रस्ते खातं शिवसेनेचं आहे, इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री देखील शिवसेनेचे आहेत त्यामुळे विकास आता जर झाला नाही तर कधी? असा सवाल प्रवीण दरेकांनी शिवसेनेला विचारला आहे. ज्या डोंबिवलीकरांनी तुम्हाला भरभरुन दिलं त्यांची सेवा कधी करणार? विकास कामात गरज लागली तर आम्ही राजकारण करणार नाही असंही दरेकर यांनी म्हटलं आहे.

प्रविण दरेकर यांनी आज कल्याण डोंबिवली शहराला भेट दिली. या दरम्यान त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर निशाणा साधला. 

'2 डोस पूर्ण झालेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा द्या'

लस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या अन्यथा रेल रोको आंदोलन करून असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. हातावर पोट असणारे शेकडो प्रवासी कर्जत आणि कसारा मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे 2 डोस घेतलेल्यांना ताबडतोब लोकल प्रवासाची परवानगी द्यावी असं प्रवीण दरेकर यांनी म्हंटलं आहे. सरकारनं आंदोलनाची वेळ आणली तर प्रखर आंदोलन करू असंही त्यांनी सांगितलं आहे. याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार तसंच रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करेन असं आश्वासन प्रवीण दरेकर यांनी केलं.