Lonikand Bus Accident : पुणे - अहमदनगर महामार्गावर लोणीकंदमध्ये खासगी बसला अपघात झाला आहे. ही बस अष्टविनायक यात्रेसाठी निघाली होती. त्यावेळी सकाळी 7 वाजता बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. बसमधून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र, अपघातात चार ते पाच जण जखमी झालेत. जखमींवर उपचार सुरू असून, सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
बसमधील प्रवाशी हे अष्टविनायक दर्शन घेण्यासाठी चालले होते. पुणे - अमहदनगर महार्मागावरुन ही बस निघाली होती. पुणे येथील प्रवाशी या बसमधून श्रीक्षेत्र रांजणगाव येथे निघाले होते. मात्र, वाघोलीच्या पुढे असणाऱ्या लोणीकंद येथील पुलगाव गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, अशी माहिती समोर आली आहे. या अपघातात चार ते पाच प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्या लोहगाव, वाघोली आणि शिक्रापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या खासगी प्रवासी बसमध्ये नेमके किती प्रवासी होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पटली झालेली बस उचलण्यासाठी घटनास्थळी क्रेन दाखल झाली आहे. दरम्यान, पुणे - नगर महामार्गावर अपघातांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
महामार्गावरील वाढत्या अपघातास वाहनांचा अतीवेग यासाठी कारणीभूत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. लोणीकंद परिसरात अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. आज पुन्हा एकदा पुणे- नगर मार्गावर पहाटे लोणीकंद येथे एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. त्यामुळे पुण्यात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे, हे स्पष्ट झाले आहे. तसेच पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर आणि जुना पुणे-मुंबई महामार्गावर आरटीओकडून वाहने धोकादायक पद्धतीने चालवणाऱ्या लेन कटिंग करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. आतापर्यंत एक हजार 803 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.