प्रियंका चतुर्वेदींनी मांडला 'या' नेत्यांच्या संपत्तीचा चढता आलेख, वाचा सविस्तर

प्रियंका चतुर्वेदी यांनी 2019 ते 2024 मध्ये या नेत्यांच्या संपत्तीमध्ये 50%-100% वाढ झाल्याचं म्हटलं आहे. ज्यामध्ये त्यांनी नेत्यांचा संपत्तीचा चढता आलेख शेअर केला आहे. वाचा सविस्तर 

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 1, 2024, 04:26 PM IST
प्रियंका चतुर्वेदींनी मांडला 'या' नेत्यांच्या संपत्तीचा चढता आलेख, वाचा सविस्तर title=

Priyanka Chaturvedi : राज्यात विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रससह इतर पक्षांमधील उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करताना या उमेदवारांनी त्यांच्या संपत्तीचा तपशील हा निवडणूक आयोगा समोर दाखल केला आहे. ज्यामध्ये महायुतीच्या नेत्यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 

याच उमेदवारांच्या संपत्तीचा वाढता आलेख शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यांच्या X वर शेअर केला आहे. त्यांच्या ट्विटमध्ये 7 नेत्यांची संपत्ती दाखवण्यात आली आहे. 

प्रियंका चतुर्वेदीच्या ट्विटमध्ये 7 नेत्यांच्या नावाचा समावेश

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी महायुतीच्या सात नेत्यांच्या नावासह त्यांच्या संपत्तीत 2019 ते 2024 मध्ये झालेली वाढ दाखवली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी शेअर केलेल्या यादीमध्ये सात नेत्यांची नावे आहेत. ज्यामध्ये गीता जैन, राहुल नार्वेकर, पराग शाह, प्रताप सरनाईक, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि धनंजय मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. 

गीता जैन या अपक्ष आमदार आहेत. त्यांची 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी 70.44 कोटी रुपये इतकी होती. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा आकडा सादर केला आहे. त्यांची एकूण संपत्ती 392.30 कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्या संपत्तीत 322 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची 2019 मध्ये 38.09 कोटी रुपये संपत्ती होती. मात्र, गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यांची एकूण संपत्ती सध्या 129.81 कोटी रुपये इतकी झाली आहे. 

राज्यातील सर्वात श्रीमंत आमदार पराग शाह यांच्या देखील संपत्तीमध्ये गेल्या 5 वर्षात मोठी वाढ झाली आहे. 2019 मध्ये त्यांची संपत्ती 500.62 कोटी होती. 2024 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी संपत्तीचा आकडा जाहीर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी 3383.06 कोटी रुपये इतकी संपत्ती दाखवली आहे. 

प्रताप सरनाईक यांची 2019 मध्ये 143. कोटी रुपये इतकी संपत्ती होती. त्यानंतर त्यांच्या संपत्तीत दुप्पट वाढ झाली आहे. 2024 मध्ये त्यांची एकूण संपत्ती ही 333.32 कोटी रुपये इतकी झाली आहे. 

तानाजी सावंत यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये 194.5 कोटी रुपये संपत्ती दाखवली होती. त्यानंतर त्यांनी 2024 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना 218.1 कोटी रुपये संपत्ती सादर केली आहे. 

दीपक केसरकर यांची 2019 मध्ये 59.70 कोटी रुपये इतकी संपत्ती होती. त्यानंतर 2024 मध्ये त्यांच्या संपत्ती 98.50 कोटी रुपये इतकी झाली आहे.