Pulwama Attack : आयत्यावेळी सुट्टी मंजूर झाली अन् महाराष्ट्रातील 'तो' जवान बचावला

दैव बलवत्तर म्हणून.... 

Updated: Feb 18, 2019, 12:49 PM IST
Pulwama Attack : आयत्यावेळी सुट्टी मंजूर झाली अन् महाराष्ट्रातील 'तो' जवान बचावला  title=

अमहदनगर : पुलवामा येथे गुरुवारी म्हणजेच १४ फेब्रुवारीला झालेल्या दशतवादी हल्ल्याने सारा देश हळहळला. २०० किलो स्फोटकांनी भरलेल्या कारने सीआरपीएफ जवान जात असणाऱ्या बसच्या ताफ्याला धडक दिली आणि होत्याचं नव्हतं झालं. अवंतीपोरा येथे क्षणार्धात ४० जवान शहीद झाले. सैनिकांना कल्पनाही नसताना घडवून आणलेल्या या हल्ल्यात महाराष्ट्रातील जवानांनाही वीरमरण आलं. याच जवानांपैकी एकाचा जीव त्याचं दैव बलवत्तर म्हणून बचावला. ज्या बसमधील जवानांना हौतात्म्य आलं त्याच बसमध्ये हा जवान बसणार होता. पण, नशीबाच्या मनात मात्र काही वेगळं होतं. 

सीआरपीएफमध्ये असणाऱ्या अहमदनगरच्या ठका बेलकर याचा या भीषण हल्ल्याचून जीव वाचला. पण, आपल्या साथीदारांना गमावल्याचं दु:ख त्यांना मरणयातनाच देत आहे. २४ फेब्रुवारीला लग्न असल्यामुळे ठका बेलकरने आपल्या सेवेतून काही दिवसांच्या सुट्टीची मागणी केली होती. पण, गुरुवारपर्यंत त्याची सुट्टी मंजूर झाली नव्हती. त्यामुळे ठकाही काश्मीरला जाणं अपेक्षित होतं. आपली सहकाऱ्यांची तुकडी बसमध्ये चढत अतसातानच तोही त्यांच्यातच होता. पण, बसमध्ये चढण्यापूर्वी काही वेळाआधीच त्याची सुट्टी मंजूर झाल्याचा संदेश मिळाला. त्यामुळे काश्मीरच्या दिशेने आपल्या बटालियनसोबत न जाता त्याने आपल्या गावी येण्याची तयारी सुरू केली. साथीदारांचा निरोप घेतल्यानंतर ठका सुट्टी मिळाल्याच्या आनंदात घरी निघण्यासाठी निघाला. 

सुखदु:खात साथ देणाऱ्या आपल्या जवान मित्रांसोबतची ती त्याची अखेरची भेट होती. कारण, त्यानंतर जे घडलं ते हादरवून टाकणारं होतं. ठका मागेच राहिला आणि त्याच्या इतर साथीदार जवानांच्या बसचा ताफा काश्मीरच्या दिशेने रवाना झाला. तो, ज्या बसमध्ये बसणार होता त्याच बसवर जैश-ए-मोहम्मदच्या फिदाईनने हल्ला केला आणि साऱ्या देशावर शोककळा पसरली. ठकाच्या साथीदारांचं होत्याचं नव्हतं झालं होतं. 

कुटुंबीयांना जेव्हा याविषयीची माहिती मिळाली तेव्हा त्यांनाही काय करावं हेच उमगत नव्हतं. अखेर ठका सुखरुप असल्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पण, यात कुठेही आनंदाचा लवलेशही नव्हता. आपल्या कुटुंबातील मुलगा वाचल्याचा दिलासा होता, पण या भारतमातेने एकाच वेळी तिचे ४० वीर पुत्र गमावल्याचं दु:ख जास्त होतं. 

लग्नघरावर दु:खाचं सावट 

२४ फेब्रुवारीला अवघ्या काही दिवसांमध्येच ठकाचं लग्न येऊन ठेपलं आहे. पण, कोणताही उत्साह त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे. अहमदनगरमधील या लग्नघरावर दु:खाचं सावट आहे. खुद्द ठकाचंही मन साथीदारांच्या आठवणींनी विषण्ण झालं आहे. आनंदाच्या या क्षणात साथीदारांच्या जाण्याचं दु:खच त्याला जास्त आहे. याविषयी काहीच न बोलण्याची विनंती तो सर्वांना करत आहे. सध्या अनेक आठवणींनीच तो गहिवरून जात आहे.