लष्कराचे प्रशिक्षण केंद्र असणारे देवळाली स्टेशन उडवण्याची धमकी

 या परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. 

Updated: Feb 18, 2019, 10:47 AM IST
लष्कराचे प्रशिक्षण केंद्र असणारे देवळाली स्टेशन उडवण्याची धमकी title=

नाशिक :  पुलवामा हल्ल्यानंतर देशात दहशतवादाविरोधी वातावरण पाहायला मिळत असून, काही महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या ठिकाणांमध्ये नाशिकमधील देवळालीचाही समावेश आहे. लष्कराचे प्रशिक्षण केंद्र असणाऱ्या या देवळाली स्थानकाला उडवण्याची धमकी मिळाली आहे. धमकीचं निनावी पत्र पोलीस आयुक्तांना मिळाल्यानंतर या परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. 

देवळाली स्टेशन येथून अनेक लष्करी अधिकारी, जवान प्रवास करतात. त्यामुळे या परिसरात सध्याच्या घडीला सुरक्षा व्यवस्था तातडीने वाढवण्यात आली आहे. लष्करी प्रशिक्षण केंद्र परिसरातही कडेकोट सुरक्षाव्यवस्था पाहायला मिळत आहे. येत्या दोन दिवसांमध्ये देवळाली स्टेशन उडवत मोठा घातपात घडवून आणण्याची धमकी मिळाल्यामुळे सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

१४ फेब्रुवारीला म्हणजेच गुरुवारी जम्मू- काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून एक आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ साऱ्या देशभारत संतापाची लाट उसळली. किंबहुना केंद्र सरकारकडूनही या हल्ल्याचं प्रतुत्तर देण्यासाठीची पावलं उचलण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत असतानाच पुन्हा एकदा या दहशतवादी कारवायांनी डोकं वर काढलं. सोमवारी पहाटेपासूनच पुलवामा येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत राष्ट्रीय राफल्स आणि सीआरपीएफच्या चार जवानांना प्राण गमवावे लागले. पुलवामाच्या जखमा त्याज्या असतानाच आमखी एक आघात झाला, तर इथे महाराष्ट्रातील नाशिकमध्ये असणाऱ्या लष्करी प्रशिक्षण केंद्रालाही निनावी पत्रातून धमक्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे परिस्थिती अतिशय तणावाची झाल्याचं स्पष्ट होत आहे.