Bhor News : टिकटॉक स्टार संतोष मुंडे याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना एकाच वेळी चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील निगडे या गावातील चार जणांवर एकाच वेळी काळाने घाला घातला आहे. (Pune Bhor News Four Farmers Died Due to Electric Shock latets marathi news)
नेमकं काय घडलं?
नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने शेतीला पाणी पुरवणारी नदीतील मोटर उघडी पडली होती. ही मोटर पाण्यात पुढे ढकलण्यासाठी निगडे गावातील आनंदा ज्ञानोबा जाधव वय 55, अमोल चंद्रकांत मालुसरे वय 32, विठ्ठल सुदाम मालुसरे वय 50,सनी विठ्ठल मालुसरे वय 27 सर्व रा. निगडे नदीवर गेले होते. मोटर पाण्यात ढकलत असताना अचानक वीजेचा प्रवाह पाण्यात उतरल्यामुळे चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये बाप-लेकाचाही समावेश आहे.
दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली असून एकाच वेळी चौघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ग्रामस्थांनी मृतदेह पाण्यातुन बाहेर काढल्यावर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. भोर तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.
दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजने अंतर्गत तसेच विज वितरण कंपनीच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळवुन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे.
सुप्रिया सुळे यांची फेसबुक पोस्ट-
भोर तालुक्यातील निगडे धांगवडी येथे पाण्यातील मोटार बाहेर काढताना वीजप्रवाह पाण्यात उतरल्याने मालुसरे कुटुंबातील तीन व जाधव कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यु झाला. ही घटना अतिशय दुःखद आहे.मालुसरे व जाधव कुटुंबावर कोसळलेल्या या कठीण प्रसंगात आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.