पुण्यात वटपौर्णिमेला साखळी चोरांचा धुमाकूळ

पुण्यामध्ये वटपौर्णिमेला साखळी चोरांनी धुमाकूळ घातला आहे.

Updated: Jun 27, 2018, 09:23 PM IST

पुणे : पुणे पिंपरी चिंचवडमध्ये वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळत असताना हा सण साखळी चोरांच्या पथ्यावर पडलाय.  साखळी चोरांनी धुमाकुळ घालत अवघ्या अडीच तासात पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून वेगवेगळ्या पोलीस स्थानकांच्या हद्दीत तब्बल अकरा महिलांच्या गळ्यातल्या दागिन्यांवर हात साफ केलाय. सकाळी आठच्या सुमारास पुण्यात लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी पहिली चोरी केलीय. शिवाजीनगर, सांगवी, वाकड, चतुश्रृंगी, भारती विद्यापीठ परिसर आणि कोंढवा अशा अकरा ठिकाणी या घटना घडल्यात. पिंपरी चिंचवडच्या सांगवी पोलिस स्थानकाच्या हद्दीत झालेल्या चार चोऱ्यांमध्ये तब्बल 1 लाख 83 हजार रुपयांचे दागिने लंपास झालेत. या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. चोरीच्या बातम्या आल्यानंतर पोलिसांनी गस्त वाढवण्यास सुरू केली आणि या घटना थांबल्या. मात्र वटपौर्णिमेला घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित होतोय.