PUNE - आंबील ओढ्यालगतच्या घरांवरील कारवाईला स्थगिती, नागरिकांचा जल्लोष

कोर्टानं पुणे महापालिकेकडून मागवलं स्पष्टीकरण

Updated: Jun 24, 2021, 04:45 PM IST
PUNE - आंबील ओढ्यालगतच्या घरांवरील कारवाईला स्थगिती, नागरिकांचा जल्लोष title=

पुणे : पुण्यातील आंबील ओढ्याच्या लगत असलेल्या झोपडपट्टी हटवण्याच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेने तात्पुरती स्थगिती दिली आहे. कारवाईला स्थगिती मिळाल्यानंतर नागरिकांनी जल्लोष केलाय. पाडलेली घरं परत बांधून द्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. इथला पोलीस बंदोबस्त देखील कमी करण्यात आला असून जेसीबीदेखील कारवाईच्या ठिकाणाहून हटवण्यात आला आहे. 

तोडक कारवाईला न्यायालयाकडून स्थगिती
स्थानिक नागरिकांनी वकिलांच्या मार्फत पुणे न्यायालयात आव्हान दिलं. यावर तातडीने सुनावणी घेत न्यायालयाने अतिक्रमणाच्या कारवाईला स्थगिती दिली. नागरिकांचं पुनर्वसन करण्याचं कोणताही रेकॉर्ड न्यायालयासमोर नाही, त्यामुळे लोकांना उद्ध्वस्त करणं उचित ठरणार नाही, या लोकांचं जोपर्यंत पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत पुणे महापालिकेच्या पाडापाडीच्या कारवाईला स्थगिती देत आहोत. पुढील आदेशापर्यंत ही स्थगिती असेल,” असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

स्थानिक आणि पोलिसांमध्ये वाद
आंबिल ओढ्यालगत असलेली घरं पाडण्याची कारवाई आज सकाळपासून सुरु करण्यात आली. स्थानिकांनी या कारवाईला जोरदार विरोध केला. पोलीस आणि स्थानिकांमध्ये मोठा वादही झाला. बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याच्या नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. कारवाईसंबंधी कुठलीही पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचं आंदोलकांनी झी 24 तासशी बोलताना सांगितलं. स्वत:चं घर गेल्यावर कुठे जायचं असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला. याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहोत. कारवाईच करायची असेल तर आधी पर्यायी व्यवस्था द्यावी त्यानंतर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली.

अतिक्रमण हटवण्यासाठी पालिकेची नोटीस
आंबील ओढ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं आहेत. ओढ्यामध्ये भर टाकून बांधकामं करण्यात आली आहेत. त्यामुळं पावसाळ्यात आसपासच्या परिसरात पाणी तुंबते. तसंच, मोठं नुकसान होतं, असं पुणे महापालिकेचं म्हणणं आहे. त्यामुळंच येथील अतिक्रमणं हटविण्याची नोटीस महापालिकेनं काढली होती. त्यानुसार आज महापालिकेतर्फे कारवाई करण्यात आली.