पुणे महापालिकेला जरा जास्तच स्वस्ताई हवी!

स्वस्त दरात काहीही मिळालं की ग्राहक म्हणून आपण खूश होतो.

Updated: Dec 28, 2019, 11:49 PM IST
पुणे महापालिकेला जरा जास्तच स्वस्ताई हवी! title=

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : स्वस्त दरात काहीही मिळालं की ग्राहक म्हणून आपण खूश होतो. मात्र ही स्वस्ताई असावी तरी किती? असा प्रश्न पुणे महापालिकेच्या निर्णयानंतर उद्भवलाय. पुणे महापालिकेला ५ रुपयात उपमा, पोहे, चहा, ६ रुपयात कॉफी, २५ रुपयात मटण खिमा आणि ३० रुपयात चिकन मसाला देणारा कंत्राटदार हवाय.

महापालिकेच्या विस्तारित इमारतीत नवीन कॅन्टीन सुरू होणार आहे. हे कॅन्टीन कंत्राटी पद्धतीने चालवण्यात येणार असू त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येतेय.. आणि त्यासाठी हे पदार्थांचे हे दर निश्चित करण्यात आले आहेत. आजच्या काळात हे दर पाहून कुणी निविदा भरेल का असा प्रश्न पडलाय, सामान्य ग्राहकही  याबाबत साशंक आहेत.

पदार्थांच्या दरांबाबत हे असं कसं शक्य आहे? असा प्रश्न महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना पडलाय. राज्य सरकारनं १० रुपयांत थाळी सुरू केलीय मात्र त्यासाठी सरकारी अनुदान असणार आहे. इथे तसं नाही. त्यामुळे स्वस्त पाहिजे या नादात खाद्य पदार्थांचा दर्जा राखला जाणार का? असा प्रश्न आहे.