Pune Mumbai highway Bus Accident : जुन्या पुणे-मुंबई हायवेवर खोपोलीजवळ बोरघाटात खासगी बस दरीत कोसळल्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 29 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मृत्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींना पंतप्रधान सहायता निधीतून 50 हजार देण्यात येणार आहे.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 15, 2023
भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर या घटनेची माहिती घेतली.
अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 15, 2023
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटना स्थळाला भेट देणार आहेत.
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, पुणे मुंबई महामार्गावरील बस अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
ते पुढे म्हणाले की, '18 प्रवाशांना एमजीएम रुग्णालयात तर, 10 प्रवाशांना खोपोली आणि एका प्रवाशाला खासगी जकोटिया रुग्णालयात उपचार सुरु आहेत.' दरम्यान या बसमध्ये एकूण 40 ते 45 जण प्रवास करत असल्याचीही प्राथमिक माहिती मिळाली आहे.