हद्दच झाली! वाहतूकीचं उल्लंघन करण्याचा नवा विक्रम, दुचाकीची किंमत 50 हजार...दंड सव्वा लाख

Pune : पुणे तिथे काय उणे, असं पुण्याबाबत नेहमीच म्हटलं जातं. याचा प्रत्यय आता पुन्हा एकदा अधोरेखित झालाय.वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्यामध्ये पुणेकरांनी आघाडी घेतलीय.. अनेक बाबींमध्ये जगभरात ख्याती असलेलं पुणे हे वाहतूकीच्या प्रश्नांमुळे बदनाम होतंय.

राजीव कासले | Updated: Aug 9, 2024, 09:38 PM IST
हद्दच झाली! वाहतूकीचं उल्लंघन करण्याचा नवा विक्रम, दुचाकीची किंमत 50 हजार...दंड सव्वा लाख title=

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे :  नेहमीच पुणेकर वेगवेगळ्या बाबींमध्ये अग्रेसर असतात, मग वाहतूक नियमांचं उल्लंघन (Violation of Traffic Rules) करण्यामध्येही पुणेकर कुठे मागे कसे राहणार? पुणे वाहतूक विभागानं (Pune Transport Department) जाहीर केलेली बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची आकडेवारी चकित करणारी आहे. MH 12 LX 4371 ही आहे पुण्यातील विक्रमवीर दुचाकी, या दुचाकीला 157 वेळा वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याचा मान मिळालाय. दुचाकीची (Two Wheelar) किंमत आहे 50  हजार आणि तिच्यावर दंड ठोठावण्यात आलाय एक लाख 21 हजार रुपये.. 

पुण्यात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर केलेल्या कारवाईची आकडेवारी समोर आली आणि धक्काच बसला.. यामध्ये प्रत्येकी एका वाहनाकडून 130 आणि 116 वेळा वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्यात आलं आहे. 21 वाहनांनी 100 पेक्षा जास्त वेळा नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलंय. तर 988 वाहनांनी 50 पेक्षा अधिक वेळा नियमांचं उल्लंघन केल्याचं आकडेवारीतून उघड झालंय. वाहतूक नियमांची ऐशी तैशी करणाऱ्या वाहनांवर मागील 5 वर्षांत तब्बत 373 कोटींचा दंड प्रलंबित आहे. 

वाहनचालकांकडून सिग्नल तोडणे, हेल्मेट न वापरणे, नो एंट्रीमध्ये गाडी टाकणे, झेब्रा क्रॉसिंगवर थांबणे, नो पार्किंगमध्ये गाडी लावणे अशा विविध प्रकारे वाहतुकीच्या नियमांना धुडकावलं जातं. त्यामुळे वाहनचालकांनी आपल्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येतंय...

शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्याची अनेक चांगल्या बाबतीत जगभरात ख्याती आहे, मात्र, वाहतूकीच्या प्रश्नांमुळे हे शहर बदनाम होतंय. स्वत:ची ओळख चांगली ठेवण्यासाठी प्रत्येक पुणेकरांनी वाहतूकीच्या नियमांचं पालन करणं गरजेचे आहे.