थोडी लाज राखा... गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिलांना हातात घ्याव्या लागल्या काठ्या

Gautami Patil : रातोरात प्रसिद्ध झालेली गौतमी पाटील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अश्लीलतेचे प्रदर्शन करत असल्याच्या वादावरुन गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

Updated: Feb 4, 2023, 10:18 AM IST
थोडी लाज राखा... गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिलांना हातात घ्याव्या लागल्या काठ्या title=

हेमंत चोपडे, झी मीडिया, पुणे :  महाराष्ट्रात सध्या राजकीय किंवा इतर घडामोडींपेक्षा गौतमी पाटील (Gautami Patil) या लावणी कलाकाराची जोरदार चर्चा सुरु आहे. कमी वेळात गौतमी पाटील हे नाव सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झालय. पण दुसरीकडे लावणी (Lavni) सादर करताना अश्लीलतेचे प्रदर्शन करत असल्याच्या आरोपांवरुन गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. मात्र दुसरीकडे महाराष्ट्रभर गौतमी पाटीलच्या लावणीचे कार्यक्रम होत आहे. गौतमी पाटीलच्या अशाच एका लावणीच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्याने गावातील महिला आक्रमक झाल्या. महिलांनी हातात काठ्या घेत गोंधळ आवरण्याचा प्रयत्न केला. 

खेड तालुक्यातील बहिरवाडी येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी नृत्याला भरभरुन प्रतिसाद देत जल्लोष केला. मात्र काही तरुणांनी कार्यक्रमात धुडघुस घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी गौतमी आणि आयोजकांना कार्यक्रम थांबविण्याची वेळ आली. यानंतर गावच्या महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी हातात काठी घेत तरुणांना दम देण्यास सुरुवात केली. यावेळी गावातील महिला तरुणांच्या गर्दीत घुसल्या आणि त्यांनी काठी उगारुन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

साताऱ्यात गौतमी पाटील विरोधात गुन्हा

आपल्या नृत्याच्या तालावर प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावणाऱ्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असते. अशाच एका कार्यक्रमात गौतमीच्या नृत्यावरुन न्यायालयाने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.  प्रतिमा शेलार यांनी गौतमी आणि तिच्या नृत्यामधील अश्लीलतेच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्याच तक्रारीची दखल घेत सातारा न्यायालयाने गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

कोण आहे गौतमी पाटील?

26 वर्षाची गौतमी पाटील ही मूळची धुळ्याची आहे. तिचं दहावीपर्यंत शिक्षण झालं आहे.  लावणीचं किंवा नृत्याचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेले नाही. इतर कलाकारांना बघून आपण लावणी शिकल्याचे गौतमीने एका पत्रकार परिषदेत सांगितले होते. गेल्या 10 वर्षांपासून गौतमी या क्षेत्रात आहे.