Pune Porsche Accident Local MLA Post: पुण्यातील कल्याणीनगरमध्ये आलीशान पोर्शे कारने दिलेल्या धडकेत एका जोडप्याचा मृत्यू झाल्याचं प्रकरण सध्या राज्यभरामध्ये चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या कारवाईला वेग आला असून या अल्पवयीन मुलाच्या हातून हा अपघात घडला त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. मुलगा अल्पवयीन असताना त्याला कार चालवण्याची परवानगी दिल्याचा ठपका ठेवत 'ब्रह्मा ग्रुप'चा मालक असलेल्या विशाल आगरवालला अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणामध्ये अजित पवार गटाचे वडगावशेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांचे नाव सातत्याने समोर येत आहे. टिंगरे यांनीच या अल्पवयीन मुलाला लवकर जामीन मिळावा म्हणून मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतल्याचा दावे करण्यात आले. सोशल मीडियावरही टिंगरे यांच्या नावाची चांगलीच चर्चा दिसून आली. असं असतानाच आता टिंगरेंनी आपली बाजू एका पोस्टच्या माध्यमातून मांडली आहे.
पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी टिंगरे हे मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये बसून असल्याचा आरोप केला. टिंगरे यांचे अग्रवाल यांच्याशी व्यवसायिक हितसंबंध असल्याचाही दावा करत सोशल मीडियावरुन बरेच दावे करण्यात आले. यावर आता टिंगरेंनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. 'कल्याणीनगरमध्ये काल (19 मे 2024) रात्री झालेल्या अपघातात दोघांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. दोन्ही मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण-तरुणीला न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून नक्की न्याय मिळेल, असा मला विश्वासही आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी आशा बाळगतो,' असं म्हणत टिंगरेंनी मरण पावलेल्यांबद्दल निस अवधिया, अश्विनी कोस्टा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
टिंगरे यांनी पुढे आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. "या दुर्दैवी अपघाताशी माझा दुरान्वयेही संबंध नसताना कालपासून सोशल मिडियात काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारीत करण्यात येत आहे. याबाबत सुरवातीला दुर्लक्ष केलं मात्र विरोधकांकडून याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं लक्षात आल्याने कालच्या घटनेबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे," असं म्हणत संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
"माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती काल पहाटे तीनच्या सुमारास माझ्या कार्यकर्त्यांनी फोन करुन दिली. तसंच माझे परिचित विशाल आगरवाल यांनीही फोन केला आणि त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाल्याचं सांगितलं. त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि नंतर येरवडा पोलिस ठाण्यात गेलो. यावेळी पोलिस ठाण्यात चौकशी केली असता पोलीस निरक्षक हे अपघातातील तरुण-तरुणींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याचं सांगण्यात आलं. मी त्यांना फोन केला असता 15 मिनिटात येत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार ते आलेही. पोलीस स्टेशनला आल्यानंतर पीआय यांनी अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानुसार आपण दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना देऊन मी तिथून निघून आलो. मी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही हे पोलीस अधिकारीही कबूल करतील, यात शंका नाही. म्हणूनच काल सकाळी 6 वाजता याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियाही झाली," असं टिंगरे यांनी म्हटलं आहे.
"दरम्यान, या अपघातप्रकरणी मी पोलिसांवर दबाव आणल्याचा खोडसाळपणा काही घटकांकडून सोशल मिडियात केला जातोय. यामुळं माझी सार्वजनिक व राजकीय जीवनात बदनामी होण्याची शक्यता असल्याने वस्तूस्थिती या ठिकाणी नमूद केली आहे. वास्तविक मी पहिल्यापासून ‘नाईट लाईफ’च्या विरोधात आहे आणि याबाबत वेळोवेळी आवाजही उठवला आहे. विमाननगर, कल्याणीनगर, खराडी या उच्चभ्रू भागात रात्री उशिरापर्यंत अवैधरित्या सुरु असलेले पब, बार आणि टेरेस हॉटेल तसंच दारु विक्री, मटका धंदा, हुक्का पार्लर, पत्त्याचे क्लब, अमली पदार्थांची विक्री, मसाज पार्लर या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत मी पोलीस आयुक्तांना यापूर्वी पत्रही दिलं आहे आणि विधानसभेतही यासंदर्भात आवाज उठवला आहे. तसंच कल्याणीनगरमधील रहिवाशांसोबत पोलीस आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊनही त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला आहे. शिवाय यापुढेही या अवैध व्यवसायांना माझा नेहमीच विरोध असेल. परंतु एखाद्या अपघाताशी कोणताही संबंध नसताना नाव जोडणं हे चुकीचं आणि बदनामीकारक आहे. सूज्ञ नागरीक या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत, असा विश्वास आहे," असं टिंगरे पोस्टच्या शेवटी म्हणालेत.
दरम्यान, दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणामध्ये न्यायिक चौकशी केली जावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पुण्यात झालेल्या भीषण अपघातात पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्यामुळे या प्रकरणी न्यायिक चौकशी व्हावी, असं वडेट्टीवार म्हणालेत.