अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यातील शुभम काजळे हा तरुण जगातील सर्वात कमी वयाचा अल्ट्रामॅन ठरलाय. माणसाच्या शारीरिक तसेच मानसिक क्षमतांचा कस पाहणारी अल्ट्रामॅन स्पर्धा नुकतीच ऑस्ट्रेलियात पार पडली. ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करण्याचा बहुमान शुभमनं मिळवलाय. पुणेकर शुभमनं भारताचा तिरंगा ऑस्ट्रेलियात फडकावलाय. त्यानं मिळवलेलं यश खरोखरच उत्तुंग असं आहे. ४२१ किलोमीटर सायकलिंग, ८४ किलोमीटर रनिंग आणि १० किलोमीटर स्विमिंग असा हा खेळ आहे. त्याला ट्रायथलॉन असं म्हणतात. महत्वाचं म्हणजे हे सगळं स्पर्धकाला ठराविक वेळेत म्हणजे ३६ तासात पूर्ण करायचं असतं. सलग तीन दिवस ही स्पर्धा चालते. असंख्य आव्हानं तसेच अडचणींचा सामना करत ही स्पर्धा पूर्ण करावी लागते. ऑस्ट्रेलियाच्या मुसमध्ये ही स्पर्धा झाली. शुभमनं अवघ्या ३१ तास ५ मिनिटांमध्ये ही स्पर्धा पूर्ण केलीय. शुभम पुण्यातील एस पी कॉलेजमध्ये शिकतो. तो अवघा २० वर्षांचा आहे. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करणारा तो जगातील सर्वात कमी वयाचा स्पर्धक ठरलाय.
यापूर्वी शुभमनं आयर्न मॅन चा 'किताब मिळवला होता. तेव्हापासूनच त्यानं अल्ट्रामॅन ची तयारी सुरु केली होती. यामध्ये त्याला त्याच्या कुटुंबीयांचं मोठं पाठबळ लाभलं. त्याची आई तर त्याची क्रू मेम्बर म्हणून स्पर्धेत सहभागी झाली होती.
यावर्षी जगभरातील केवळ ५४ स्पर्धक या स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. त्यातील ४८ जणांनी स्पर्धेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांपैकी फक्त ४४ जणांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. आतापर्यंत केवळ १२ भारतीय हे अल्ट्रा मॅन ठरले आहेत. त्यापैकी एक असण्याचा मान शुभमनं मिळवलाय. आपल्या देशासाठीची ही अभिमानाची बाब आहे.