प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : राज्यातील विविध जिल्ह्यात अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जोरदार कमबॅक केलंय. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मुंबईची तुंबई झाली. अनेकांना जीवाला मुकावे लागले. मुंबईसह कोकणातही मुसळधार पाऊस झालाय. काही ठिकाणी दरड कोसळल्याचीही घटना घडली. रायगड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कोसळधार झाली. खोपली तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसात दुर्देवी घटना घडलीयं. दोन सख्खी भावंड नाल्यात वाहून गेली आहेत. (Raigad Khopoli 2 siblings were swept away in the nala search began)
खोपोलीतील क्रांतीनगर परिसरात हा दुर्देवी प्रकार घडला आहे. नीलम हंचलीकर (7 वर्ष) आणि बाबू हंचलीकर (5 वर्षे) अशी या भावंडांची नावं आहेत. दुपारी साडे तीनच्या दरम्यान हा दुर्देवी प्रकार घडलाय. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी शोधमोहिमेला सुरुवात केली. दरम्यान या दुर्देवी प्रकारामुळे खोपोलिकरांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नक्की काय घडलं?
ही दोन्ही भावंडं दुपारी ३ च्या दरम्यान घराजवळ खेळत होती. या वस्तीच्या बाजूला मोठा नाला आहे. ही दोन्ही भावंडं खेळता खेळता नाल्यात पडून वाहून गेली. हा प्रकार काही उपस्थितांनी पाहिला. मात्र नाल्यातील पाण्याचा वेग जास्त असल्याने त्यांना काही करता आले नाही. दरम्यान या मुलांचा गेल्या काही तासांपासून युद्धपातळीवर शोध सुरु आहे.