सोलापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवर वाजविले जाणारे भोंगे बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या या भूमिकेला पुणे शहर अध्यक्ष वंसत मोरे यांनी असहमती दर्शविली होती. त्यानतंर आज अचानक पुणे शहराध्यक्षपदावरुन वसंत मोरे यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मनसेमध्ये तिढा वाढला असतानाच मनसेचे सोलापूर शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख यांनीही तिखट प्रतिक्रिया दिलीय. गुढीपाडवा मेळाव्यात राजसाहेब ठाकरे यांनी मशिदीवर भोंग्याबाबत आदेश दिला. पण, काही लोकांना तो कळला नाही.
राज ठाकरे यांनी नमाज पठाण कार्याला किंवा अजान देण्यास विरोध केलेला नाही. तर, मशीदवरील भोंग्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत तीच भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे.
राज ठाकरे यांनी ठाम भूमिका मांडल्यानंतर पदाधिकारी राजीनामे देत आहेत. मात्र, त्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांची भूमिका समजलेलीच नाही अशी टीका करत जैनोद्दीन शेख यांनी राज ठाकरे यांच्या भोंग्यासंदर्भातील भूमिकेला समर्थन दिलंय.