धुळे : राज्यात उष्माघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अनेक ठिकाणचे विहिरी, नाले, तलाव आतापासूनच कोरडे पडू लागले आहेत. अशातच धुळ्यातील काही गावामध्ये त्याने हैदोस घातला होता.
मार्च महिन्यापासून धवळी विहीर, रोहण, मैंदाणे, बोदगाव, चिंचपाडा शिवार या परीसरात 'त्याने' हैदोस घातला होता. आतापर्यंत अनेक पाळीव प्राण्यांचा 'त्याने' फडशा पाडला होता.
आधीच पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट त्यात या बिबट्याचा मुक्त संचार यामुळे परिसरात नागरिक जीव मुठीत घेऊन जगत होते. तर, कांदा, गहू यासारख्या पिकांना रात्री पाणी देण्यासाठी, शेतात जाण्यासाठी शेतकरी धजावत नव्हता.
दिवसाचा उष्मा सहन होत नाही. रात्रीही या झळा कमी अधिक प्रमाणात जाणवत असल्याने लहान मोठ्या प्राण्यांपासून सगळेच आपली तहान भागविण्यासाठी पाण्याचा शोध घेत इतरत्र फिरतात.
रोज नवनवीन शिकार करणाऱ्या त्या बिबट्यालाही अशीच तहान लागली. पाण्याचा शोध घेत तो दहिवेल रस्त्यावरील धवळी विहीर शिवारात आला. ही विहीर तात्या मोतीराम साबळे यांच्या शेतात होती. त्याला त्या विहिरीचा अंदाज आला नाही आणि पाण्याच्या शोधात आलेला तो बिबट्या (leopard) खोल विहिरीत धाडकन पडला.
शेतकरी तात्या मोतीराम साबळे हे सकाळी आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी आले असताना त्यांना हा बिबट्या दिसला. याच बिबट्याच्या दहशतीमुळे लोक घराबाहेर पडायला धजावत नव्हते. नागरिकांनी त्याची लेखी तक्रार वन विभागाला दिली होती. त्यामुळे त्याला पहाण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.
कोंडायबारी वन विभागाला ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पहाणी केली. अधिकाऱ्यांनी विहीर परिसरात पिंजरा लावला. त्या बिबट्याला विहिरीबाहेर काढून पिंजऱ्यात बंदिस्त केले आणि नंतर सुखरूप जंगलात सोडले.