रत्नागिरी : Rajapurchi Ganga : कोकणातील प्रसिद्ध अशा राजापुरात गंगामाईचं आगमन झाले आहे. मागील दहा दिवसांमध्ये हजारो भाविकांनी यावेळी गंगेत स्नान केलं आहे. गंगेचं आगमन हा नेहमी अभ्यासकांचा देखील विषय राहिला आहे. गंगामाई आल्यानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशविदेशातून अनेक भाविक गंगेच्या दर्शनाला येतात. मात्र, कोरोनातील लॉकडाउनमुळे अनेक भाविकांनी गंगास्नानाची ही पर्वणी साधता आलेली नव्हती. आता गंगा ठिकाणी गर्दी वाढताना दिसत आहे.
दिवसागणिक हवेतील उष्मा आणि तापमान वाढत असताना रविवारी शहराजवळील उन्हाळे येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्री पवित्र गंगेचे आगमन झाले आहे. सद्यःस्थितीमध्ये मूळ गंगा, काशिकुंड, गायमुख आणि सर्व कुंडांमध्ये मुबलक प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरु आहे.
उन्हाळे येथील तीर्थक्षेत्री गंगेचे होणारे आगमन आणि वास्तव्याचा काळ भाविकांच्या दृष्टीने एक धार्मिक पर्वणी असते. त्यामुळे गंगेच्या वास्तव्याच्या काळात राज्यातील भाविक या ठिकाणी स्नान करण्यासाठी येत असतात. आतापासून येथे गर्दी होत आहे.
गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात आलेल्या गंगामाईचे साधारण अडीच-तीन महिन्याच्या वास्तव्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये गंगेचे निर्गमन झाले होते.