..तर राज्य सरकारचा सातबारा कोरा होईल, रामदास आठवलेंचा टोला

आठवलेंचा राज्य सरकारला टोला

Updated: Oct 22, 2020, 09:43 PM IST
..तर राज्य सरकारचा सातबारा कोरा होईल, रामदास आठवलेंचा टोला  title=

सांगली : मुख्यमंत्री होण्याआगोदर उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं सांगत होते. तुम्ही आता मुख्यमंत्री झाला आहात तुम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही तर या राज्य सरकारचा सातबारा कोरा केला जाईल असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावलाय. 

शरद पवारांचा मी आदर करतो ते ज्येष्ठ नेते आहेत.  पवार साहेब एनडीएमध्ये येऊन पंतप्रधान मोदींच्या खांद्याला खांदा लावून काम करावं अशी माझी इच्छा होती म्हणून मी ती व्यक्त केली. यात पवार साहेबांचा अनादर करणे हा माझा उद्देश नव्हता असे आाठवलेंनी स्पष्ट केले.जरी पवार साहेबांनी माझ्याविषयी टीका केली असली तरी मी त्याविषयी नाराज नाही त्याविषयी मी बोलणार नाही. कारण शरद पवार हे आमचे नेते असल्याचे ते म्हणाले. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मताशी मी सहमत असून केंद्र सरकारने राज्याला मदत केलीच पाहिजे. मात्र त्या अगोदर राज्यसरकारने सुद्धा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणे आवश्यक असल्याचे आठवले म्हणाले. 

शरद पवार यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलेल आहे. मी सुद्धा पंतप्रधानांना पत्र लिहून महाराष्ट्राला मदत देण्याबाबत मागणी करणार आहे. ज्या महाराष्ट्राने मला राज्यात एकदा मंत्री केलं केंद्रात दोनदा मंत्री केलं अनेक वेळा खासदार केलं अशा महाराष्ट्राला अडचणीच्या काळात केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आठवले म्हणाले.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जात असले तरी त्यांच्यावर अन्य आमदार राष्ट्रवादीत जाणार नाहीत. भाजपचे आमदार राष्ट्रवादी जाणार ही फक्त अफवा आहे. राष्ट्रवादीला आता जाऊन काही उपयोग सुद्धा नाही. कारण अगोदरच त्याठिकाणी सर्व मंत्री पद भरलेली असल्याचे आठवले म्हणाले. 

यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांना देखील टोला लगावला. प्रकाश आंबेडकरांना पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही. ते नेहमी कोणावरही टीका करत असतात. पंतप्रधानांच्या विषयी आदर ठेवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. उलट सुलट वक्तव्य करून बातम्या छापून याव्यात म्हणून प्रकाश आंबेडकर हे मोदी यांच्यावर टीका करत असल्याचेही ते पुढे म्हणाले.