खैरे विरुद्ध कदम वादात खैरेंची बाजी?

रामदास कदम यांना औरंगाबादच्या पालकमंत्री पदावरून हटवण्यात आलंय. त्यांच्या जागी आता डॉ. दिपक सावंत यांची नेमणूक करण्यात आलीय. मात्र, कदमांच्या या उचलबांगडीमुळं खासदार खैरैंच्या राजकारणाचा विजय झाल्याची चर्चा रंगलीय.

Updated: Jan 19, 2018, 10:31 AM IST
खैरे विरुद्ध कदम वादात खैरेंची बाजी?  title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : रामदास कदम यांना औरंगाबादच्या पालकमंत्री पदावरून हटवण्यात आलंय. त्यांच्या जागी आता डॉ. दिपक सावंत यांची नेमणूक करण्यात आलीय. मात्र, कदमांच्या या उचलबांगडीमुळं खासदार खैरैंच्या राजकारणाचा विजय झाल्याची चर्चा रंगलीय.

खैरेंची शक्ती पणाला

रामदास कदम गेली तीन वर्ष औरंगाबादचे पालकमंत्री होते, औरंगाबादेत भाजपसमोर शिवसेनेचे वजन कमी होऊ नये म्हणून असा आक्रमक नेता शिवसेनेनं औरंगाबादचा पालकमंत्री म्हणून दिला. मात्र आता अचानकपणे कदमांचं औरंगाबादचं पालकमंत्रीपद काढून त्यांना नांदेडचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. हे सगळं तडफाफडकी झालं असं दिसत असलं तरी हे इतकं सहजतेनं झालं नाही... तर खासदार चंद्रकांत खैरै यांनी सर्व शक्ती पणाला लावून हे घडवून आणलंय.

खैरे विरुद्ध कदम वाद

जेव्हापासून कदम पालकमंत्री झाले तेव्हापासूनच खैरै आणि कदमांचं पटत नव्हतं... कदम अगदी जाहीर भाषषणातसुद्धा खैरैंची खिल्ली उडवायचे... अनेक कार्यक्रमात खैरैंना अपमानास्पद वागणूक दिल्याचंही औरंगाबादकरांनी पाहिलंय. त्यात खैरैंचं महत्त्व कमी करून जिल्हाप्रमुख दानवेंच्या माध्यमातून कदमांनी स्वत:चा मजबूत गट बनवला. तेव्हापासूनच खैरे गटात गोंधळ सुरु झाला, पाहता पाहता कदमांनी महापालिकाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र खैरे चवताळून उठले आणि कदमांना अंधारात ठेवत मातोश्रीवरून खलबत करीत थेट स्वत:चा उमेदवार महापौरपदी बसवला.

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर

असे एक ना अनेक किस्से घडल्यानंतर खैरैंनी कदमांना हटवण्याच्या हालचाली सुरु केल्या, थेट मातोश्रीवरही खैरॆंनी पुर्ण वजन वापरले आणि अखेर बदल घडवून आणला. गेले काही दिवस खैरे सतत मातोश्रीवर होते. औरंगाबाद शिवसेना कशी कमजोर होत चालली आहे आणि येणारी लोकसभा निवडणूक कशी कठीण जाईल, हे पटवण्यात खैरे यशस्वी झाले आणि लोकसभा निवडणुकांचा विचार करीत अखेर मातोश्रीनंसुद्धा खैरेंच्या पारड्यात वजन टाकले आणि कदमांची गच्छंती झाली.

'उद्धव ठाकरेंनाच विचारा'

कदमांनी मात्र या सगळ्यानंतर सावध भूमिका घेतलीय. मला काही माहिती नाही थेट उद्धव ठाकरॆंनाच विचारा असं कदम म्हणतायत... दिलेल्या नव्या जवाबदारीवरही आनंदी असल्याचं कदम यांनी म्हटलंय. 

एकीकडे लोकसभेसाठी भाजपा जोरदार मोर्चेबांधणी करीत आहे त्यात शिवसेना बॅकफूटवर गेली आहे त्यामुळं पुन्हा लोकसभेच्या निमित्तानं शिवसेनेनं 'खैरे'कार्ड मजबूत करण्याचा केलेला हा प्रयत्न म्हणता येईल. मात्र या सगळ्यात औरंगाबाद शिवसेना मात्र चांगलीच हादरलीय.