नितेश महाजन, झी मीडिया, जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी राज्यात पुन्हा भाजपची (BJP) सत्ता येणार असल्याचे संकेत दिले आहेत. आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या उपस्थितीत जालना शहरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं.
यावेळी आयोजित कार्यक्रमात दानवे यांनी टोपे यांना उद्देशून जालना जिल्ह्यात जे कामं करायचे असेल ते लवकर करून टाका, राज्य सरकारचे थोडे दिवस उरले असून मी फक्त 2 ते 3 दिवस विरोधी पक्षात आहे, अशा प्रकारचं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी राजेश टोपे यांना उद्देशून केलं. दानवे यांनी 2 ते 3 दिवसांतच राज्यात सत्ता स्थापनेचे संकेत दिले आहेत.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता देखील दानवे यांनी फेटाळून लावली. तसंच शिंदे गटाशी युती करायची की नाही याबाबत भाजपचे राज्यातील नेते निर्णय घेतील असंही दानवे यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची गुजरातमध्ये कोणतीही भेट झाली नाही असं दानवे यांनी स्पष्ट केलं.
आमच्या पक्षाच्या बैठका जरी सुरू असल्या तरी राज्यातील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत असंही दानवे यांनी नमूद केलं. राष्ट्रवादी कायदेशीर लढाई त्यांच्या पद्धतीने लढणार असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे असंही दानवे म्हणाले