तांबडी बलात्कार प्रकरण : आणखी सहा जणांना अटक, एका अल्पवयीन मुलाचाही समावेश

रायगडच्या रोहा तालुक्यातील तांबडी ताम्हणशेत इथल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खून प्रकरणी आणखी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.  

Updated: Aug 1, 2020, 09:10 AM IST
तांबडी बलात्कार प्रकरण : आणखी सहा जणांना अटक, एका अल्पवयीन मुलाचाही समावेश

अलिबाग : रायगडच्या रोहा तालुक्यातील तांबडी ताम्हणशेत इथल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खून प्रकरणी आणखी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. यापूर्वी एका आरोपीला अटक झाली आहे. आता या गुन्ह्यातील आरोपींची संख्या सात इतकी झाली आहे.

२६ जुलै २०२० रोजी संध्याकाळी ही अल्पवयीन मुलगी बेपता झाली होती. ग्रामस्थानी तिचा शोध घेतला असता एक ठिकाणी तिची स्कूटर आढळून आली.  त्या दिशेने शोध घेतला असता, त्याच रात्री तिचा मृतदेह दरीमध्ये विवस्त्र अवस्थेत सापडला होता. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांनी याठिकाणी भेट देऊन राज्य सरकारवर टीका केली होती. 

सुरुवातीलाच पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. परंतु गुन्ह्याचे स्वरूप पाहता हे एकट्यादुकट्या व्यक्तीचे काम नाही. त्यामुळे इतर आरोपीना तातडीने अटक करा, अशी मागणी पीडित मुलीच्या नातेवाईकांकडून केली जात होती.  आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने संपूर्ण घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी आणखी सहा जणांना अटक केली आहे.

या सगळ्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या गुन्ह्यामागे आरोपींचा नेमका काय हेतू होता, यामागे काही राजकारण होते का, याचा शोध घेण्याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.