ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याला भेट दिली.यावेळी रश्मी ठाकरे यांनी टेंभी नाक्याच्या देवीचं (Tembhinakyachi Devi) दर्शन घेतलं. रश्मी ठाकरेंच्या हस्ते देवीची पूजा आणि आरती करण्यात आली. रश्मी ठाकरे यांच्यासोबत यावेळी मोठ्याप्रमाणावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आनंद दिघेंच्या टेंभी नाक्यावरच्या पुतळ्याला त्यांनी आधी पुष्पहार घातला. त्यानंतर रश्मी ठाकरेंनी देवीचं दर्शन घेतलं. रश्मी ठाकरेंच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी त्यांच्याबरोबर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत उपस्थित होत्या. टेंभी नाक्याच्या देवी मंडळामध्ये शिंदे गटाचा दबदबा आहे. आनंद दिघे यांनी या देवीच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात केली होती. रश्मी ठाकरेंनी सलग दुसऱ्या वर्षी टेंभीनाक्याच्या देवीचं दर्शन घेतलं.
कुलर, पंखे केले बंद
दरम्यान, रश्मी ठाकरे टेंभी नाका देवीच्या दर्शनाला गेल्या त्यावेळी मंडपातले कुलर्स, पंखे जाणून बुजून बंद करण्यात आले, असा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. रश्मी ठाकरे या सभा मंडपात प्रवेश करण्याच्या पाच मिनिट आधी या देवीच्या गाभार्यातील सर्व कुलर आणि पंखे अचानक बंद झाले. यानंतर देवीचे दर्शन आणि आरती झाल्यानंतर रश्मी ठाकरे या पुन्हा सभा मंडपातून बाहेर पडल्या. त्यानंतर काही वेळातच पंखे आणि कुलर पुन्हा सुरू झाले ज्यावेळी सभामंडपात रश्मी ठाकरे होत्या त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्यामुळे अनेकांना उकाड्याचा त्रास जाणवला. आता हा फक्त योगायोग होता की कोणी जाणून बुजून हे कृत्य केलं याबाबत ठाण्यात उलट सुलट चर्चा होत आहेत.
ऑक्टोबर हिटमुळे राज्यात प्रचंड उष्मा वाढलाय. मात्र या उन्हाच्या या तीव्र झळांपेक्षा ठाण्यातल्या नवरात्रौत्सवातल्या राजकारणामुळे शिंदे आणि ठाकरे गटातलं वातावरण चांगलंच तापलंय.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
कनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर रश्मी ठाकरे यांनी दुसऱ्यांदा ठाणे दौरा केला आहे. टेंभीनाक्याच्या नवरात्रोत्सवाचे आयोजक हे शिंदे गटाचे आहेत. देवी सर्वांची आहे, देवीच्या दर्शनाला जे येतील त्यांचं स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया आयोजकांकडून देण्यात आली. दरवर्षी रश्मी ठाकरे टेंभीनाक्याला देवीच्या दर्शनाला येत असतात. तोच शिरस्ता यंदाही रश्मी ठाकरे यांनी कायम ठेवला.