Ratnadurg Bhagwati Devi Mandir Ratnagiri : कोकणातील अथांग समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. याच कोकणात अनेक ऐतिहासिक पर्यटन स्थळ देखील आहेत. यापैकीच एक आहे तो रत्नागिरी शहराजवळ असलेला रत्नदुर्ग किल्ला. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात एक छुपा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग थेट अरबी समुद्रात बाहेर पडतो. हा किल्ला पाहण्यासाठी नेहमीच येथे पर्यटकांची गर्दी असते. याच किल्ल्यावर भगवती देवीचे मंदिर आहे. हे मंदिर शिवकालीन आहे.
रत्नदुर्ग किल्ला हा रत्नागिरी शहरापासून अवघ्या दोन ते तीन किलो मीटर अंतरावर आहे. रत्नागिरी शहरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांना रत्नदुर्ग किल्ला हा मुख्य आकर्षण असते. हा किल्ला तीन बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला आहे. या किल्ल्याच्या आग्रेय दिशेला जमीन आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे. या किल्ल्याचा आकार किल्ल्याचा आकार घोडाच्या नालासारखा आहे. किल्ल्यावरुन दि्सणाऱ्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणाऱ्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे किल्ला नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतो. 120 एकर क्षेत्रफळावर पसरलेला हा किल्ला अतिशय सुदंर आहे.
बहामनी राजवटीत बांधला गेलेला हा किल्ला आदिलशहाने ताब्यात घेतला. यानंतर 1670 साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशहाच्या ताब्यातून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. संभाजी राजेंनी या किल्ल्यावर काही काळ वास्तव्य केले. त्यानंतरच्या काळात हा किल्ला करवीर छत्रपतींच्या ताब्यात गेला. त्यानंतर हा किल्ला आंग्रे कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.आंग्रे सोबतच्या युद्धात पेशव्यांनी हा किल्ला जिंकला पण शेवटी 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
किल्ल्याची लांबी अंदाजे 1300 मीटर आणि रुंदी 1000 मीटर आहे. किल्ल्याच्या दक्षिण-पूर्वेकडून पश्चिमेकडे मजबूत तटबंदी आहे. तटबंदीच्या मध्यभागी एक मुख्य प्रवेशद्वार आहे. एका बुरुजावर दीपगृह आहे. या बुरुजाला “सिद्ध बुरुज” असे म्हणतात. किल्ल्याच्या परिसरात अनेक झाडे आहेत. किल्ल्यावर भगवती देवीचे मंदिर देखील आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच असलेले भगवती देवीचे मंदिर हे शिवकालीन मंदिर आहे. बालेकिल्ल्याला 9 बुरुज आहेत. तर, संपूर्ण किल्ल्याला एकूण 29 बुरुज आहेत. किल्ला पेठ, बालेकिल्ला आणि दीपगृह अशा तीन भागांत विभागला आहे. किल्ल्याच्या तीनही बाजूंना समुद्र तर एका बाजूला दीपगृह आहे.
किल्ल्यावर तीन तोंडाचा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग पर्यटकांसाठी बंद आहे. हा भुयारी मार्ग समुद्रात बाहेर पडतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येतांना लागणाऱ्या तटबंदीवरून या भुयाराचा शेवट खाली समुद्रकिनाऱ्यावर ज्याठिकाणी होतो तेथे असलेले गुहेसारखे भुयार स्पष्ट दिसते.
जवळचे रेल्वे स्थानक रत्नागिरी आहे. रत्नागिरी शहरातून रिक्षा पकडून थेट किल्यापर्यंत जाता येते. किल्ल्याजवळ राहण्याची तसेच जेवणाची सोय नाही.