विजयादशमी उत्सव २०२० : सरसंघचालकांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे

अवघ्या ५० स्वयंसेवकांची उपस्थिती

Updated: Oct 25, 2020, 10:37 AM IST
विजयादशमी उत्सव २०२० : सरसंघचालकांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे
छाया सौजन्य- एएनआय

नागपूर : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजनानंतर नागपूरातील महर्षी व्यास सभागृहात यंदाचा विजयादशमी उत्सव पार पडला. कोरोना पार्श्वभूमीवर अगदी साधेपणानं हा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी अवघ्या ५० स्वयंसेवकांची उपस्थिती पाहायला मिळाली. 

दरवर्षीप्रमाणे संघाचं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळालं नसलं तरीही या वेळी ऑनलाईन पद्धतीचा वापर करत सरसंघचालकांनी स्वयंसेवक आणि राष्ट्राला उद्देशून संबोधनपर भाषण केलं. यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करत सर्वांचं लक्ष वेधलं. हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करत भारतानं चीनपेक्षा शक्तिशाली होण्याचा आग्रही सूर त्यांनी यावेळी आळवला. 

सरसंघचालकांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे 

- देशातील अनेक राष्ट्रांच्या तुलनेत भारतात कोरोनाचं सावट अतिशय कमी आहे. या संकटाच्या वेळीसुद्धा भारत धीरानं उभा असल्याचं पाहायला मिळत आहे. 

- रामजन्मभूमीबाबतचा निर्णय देत सर्वोच्च न्यायालयानं इतिहास रचला. भारतीय जनतेनं या निर्णयाचा संयमानं स्वीकार केला. 

- CAA चा काहींनी विरोध केला. पण, यामुळं कोणाच्याही नागरिकत्वाला धोका नाही. 

- मतभेद आहेत, ते दूरही होत असतात. ते दूर करुनच चीनला टक्कर द्यायची असल्यास शेजारी राष्ट्रांशी असणारे संबंध चांगले ठेवण्याची गरज. मैत्रीचं नातं टीकवणं म्हणजे कमकुवतपणाचं लक्षण नाही. असं वाटत असलेल्या राष्ट्रांना आपण प्रत्युत्तर दिलं आहे. 

- हिंदुत्व देशाची ओळख. हिंदुत्वाचा संकुचित अर्थ घेऊ नका. धर्मनिरपेक्ष नावानं देशाचे तुकडे नकोत.

- भारताचा स्वभाव सर्वांशी मैत्रीचा आहे. चीनचा स्वभाव विस्तारवादी. भारताला चीनपेक्षा शक्तीशाली व्हावं लागेल.

 - भावनिक एकात्मतेसह देशांतर्गत सलोखाही तितकाच महत्त्वाचा. 

- भारतापासून भारतीय वेगळे होऊच शकत नाहीत आणि झाले तर त्याचे परिणाम चांगले नाहीत. याची उदाहरणं आपण पाहतोच आहोत. 

 

महत्त्वाच्या मुद्द्यांवर चौफेर नजर टाकत सरसंघचालकांनी यावेळी देशाला सतर्क करत काही महत्त्वाचे संदेश दिल्याचं पाहायला मिळालं.