मालेगावात बसमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने खळबळ

बस सुटण्यापूर्वी ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयात बसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन आला. 

Updated: Aug 17, 2019, 11:27 AM IST
मालेगावात बसमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने खळबळ title=

निलेश  वाघ , झी मीडिया , मालेगाव: मालेगावहून सुरतला जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी दुरध्वनीमुळे शुक्रवारी रात्री चांगलीच खळबळ उडाली. मात्र, बॉम्बशोधक व नाशक पथकाने बसची दोन तास तपासणी केल्यानंतर काहीच हाती लागले नाही. त्यामुळे प्रवांशासह पोलीस यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला. 

मालेगाव  शहरात यापूर्वी दोनवेळा बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी रात्री अकरा वाजता मालेगावच्या आंबेडकर पुतळा परिसरातील एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस सुरतकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र, बस सुटण्यापूर्वी ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयात बसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन आला. 

यानंतर ट्रॅव्हल्स कंपनीने तात्काळ पोलिसांना याबद्दल माहिती दिली. तेव्हा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत बसचा ताबा घेतला. 
 
उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी तात्काळ बॉम्ब शोधक व नाशक पथकास पाचारण केले. पथकाने बससह बसमधील सामानाची सुमारे दोन तास कसून तपासणी केली. मात्र, तपासणीत कुठलीच आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेसह प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. 

दरम्यानच्या काळात ही माहिती शहरात पसरल्याने नागरिकांनी किदवाई रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे पोलीसांनी शहिदोंकी यादगार ते आंबेडकर पुतळापर्यंत रस्ता बंद केला होता. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून सुरतहून मालेगावकडे येणाऱ्या खाजगी बसेसची तपासणी करण्यात येत आहे.