अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : रायपूरकडून सुरतच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या खाजगी ट्रॅव्हलने अचानक पेट घेतली. या घटनेत ट्रॅव्हल पूर्णत: जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना अमरावती-नागपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर घडली. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास तिवसा पोलीस स्टेशन समोर हा अपघात झाला. सुदैवाने ट्रॅव्हल्स चालकाच्या प्रसंगवधानाने मोठा अनर्थ टळला असून ट्रॅव्हल्समधील सर्व ५२ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय.
घटनेची माहिती मिळताच तिवसा नगरपंचायतीच्या अग्निशामक दलास आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या तीन बंब, पोलीस प्रशासन आणि नागरिकाच्या प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र आग एवढी भीषण होती की ट्रॅव्हल्सचा अक्षरश: कोळसा झाला. महामार्गावर ट्रॅव्हलला लागलेल्या या आगीमुळे राष्ट्रीय महामार्ग तबल दोन तास ठप्प झाला होता.
अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग ६ वर रात्री २ वाजण्याच्या सुमारास महेंद्र ट्रॅव्हल्स क्रमांक CG 19, F-0231 ही बस रायपूरवरून प्रवाशी घेवून नागपूर, अमरावती मार्गे सुरतकडे जात होती. दरम्यान नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्गावर तिवसा पोलीस स्टेशनसमोर अचानक या ट्रॅव्हल्सने पेट घेतला.