'राजू शेट्टींनी माझ्यावरील आरोप सिद्ध करावेत, अन्यथा भरचौकात विष्टा खावी'

शेकडो शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक

Updated: Sep 1, 2019, 03:40 PM IST
'राजू शेट्टींनी माझ्यावरील आरोप सिद्ध करावेत, अन्यथा भरचौकात विष्टा खावी' title=

कोल्हापूर: कडकनाथ कोंबडीपालन फसवणूक प्रकरणात रविवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. या गैरव्यवहारात माझा सहभाग असल्याचे पुरावे राजू शेट्टी यांनी द्यावेत. हे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण कायमचं सोडून देईन. मात्र, पुरावे सादर करता आले नाहीत तर माझ्यावर टीका करणाऱ्यांनी भर चौकात विष्टा खावी, असे सदाभाऊ घोत यांनी म्हटले. 

कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जवळपास ५०० कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी महारयत ऍग्रो कंपनीचा संस्थापक अध्यक्ष सुधीर मोहिते याच्यासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर मोहिते, संदीप मोहिते यांच्यासह कंपनीचे कर्मचारी हनुमंत जगदाळे, विनय शेंडे, एजंट गणेश शेवाळे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

इस्लामपूर पोलिसांनी संदीप मोहितेला अटक केली. पोलिसांनी कंपनीची सर्व बँक खाती गोठवली आहेत. इस्लामपूर येथील दोन कार्यालयातील कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. शेकडो शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे.

आरोपी गणेश शेवाळे हा कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर यांचा मित्र आणि कार्यकर्ता आहे. त्याच्या फेसबुकवर सागर खोत आणि मुख्य आरोपी संदीप मोहिते यांचे फोटो आहेत. त्यामुळे या गैरव्यवहारात सदाभाऊ खोत आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सहभाग असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. यावर सदाभाऊ खोत यांनी आरोप सिद्ध झाले तर मी कायमच राजकारण सोडून देईन असे आव्हान दिले आहे.