सांगली : सांगली, कोल्हापूरमधील भीषण अख्या महाराष्ट्राने पाहिली. महापुरानंतर आता महापुराचा विळखा आता सैल होऊ लागला आहे. महाराष्ट्रभरातून या ठिकाणी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. शिवप्रतिष्ठानचे धारकरी आणि संभाजी भिडे गुरूजी देखील पूरग्रस्तांना मदत करत आहेत. संभाजी भिडे गुरूजी आणि त्यांचे धारकरी कोल्हापूर आणि सांगली या भागात मदतकार्यात लागले आहेत. पुरात त्यांनी टायरच्या बोटी तयार करुन अनेकांचे प्राण वाचवले. पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना अन्नपदार्थ पुरवण्याचं कामही शिवप्रतिष्ठान करतं आहे.
महाराष्ट्रातून सांगली आणि कोल्हापूरसाठी मदत पाठवली जात आहे. धान्य, कपडे, रोजच्या लागणाऱ्या वस्तू अशा प्रकारे ही मदत महाराष्ट्राच्या विविध भागामधून पाठवली जात आहे.
महाराष्ट्रात पुरामुळे बळी गेलेल्यांची संख्या ४३वर पोहचली आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांला पुराचा फटका बसला असून यामध्ये ४३ जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर तीन जण बेपत्ता आहेत. पुराचा फटका बसलेल्या ५८४ गावांतील ४ लाख ७४ हजार २२६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पूरग्रस्तांची ५९६ तात्पुरत्या छावण्यांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरातलं पाणी मोठ्या प्रमाणावर ओसरु लागलं आहे. मात्र आता साथीच्या रोगाचं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. स्वच्छता आणि साथरोग निर्मूलनाचे काम सुरू आहे. आठवडाभर ठप्प झालेलं जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागले आहे.