मिलिंद अंडे, झी मीडिया, वर्धा : काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर (samruddhi highway) बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे विदर्भ ट्रॅव्हल्सचा (Buldhana Bus Accident) भीषण अपघात झाला होता. या अपघातात 25 प्रवाशांचा जळून कोळसा झाला होता. या घटनेला आता वीस दिवस उलटले असतानाही शासनाची उदासिनता कायम असल्याचे दिसून आले आहे. या अपघातील मृतांच्या डीएनएन (DNA) चाचणीचे अहवाल आले नसल्याचे समोर आले आहे. या पेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे अद्याप पीडितांच्या कुटुंबियांना शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही.
बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला होता. तसेच अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. यासोबत राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला होता. यासोबतच ट्रॅव्हल्स मालकावरही गुन्हा दाखल झाला नाही. असे मुद्दे उपस्थित करून 14 मृतकांच्या कुटुंबियांनी वर्ध्याच्या जिलाधिकाऱ्यांची भेट घेत रोष व्यक्त केला आहे.
बुलढाणा अपघातातील मृतदेहावर अंत्यसंस्कार पूर्ण व्हायच्या आधीच महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळ विस्तार करत शपथ विधी सोहळा घेतला होता. पण सरकारला मात्र वीस दिवसात डीएनए अहवाल अद्याप मिळू शकले नाहीत. याबाबत वर्ध्यातील कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे. या सर्व तक्रारी पीडितांच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्यापुढे मांडल्या आहेत.
वर्धा जिल्ह्यातून विदर्भ ट्रॅव्हल्सच्या गाड्या अजूनही धावत आहे. त्यांची तपासणी करण्यात येत आहे की नाही? ज्या मालकाची ही ट्रॅव्हल्स आहे तो वाहतूक विभागाचा अधिकारी आहे, त्यामुळे तर त्याच्यावर कारवाई होणार आहे की नाही? असे अनेक प्रश्न पीडित कुटुंबियांनी विचारले आहे. या अपघातासाठी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या चालकासह मालक देखील दोषी आहे... त्याबतची अनेक तथ्ये समोर आली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
गाडीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. गाडीला पीयूसी नाही, फिटनेस सर्टिफिकेट नाही. ज्याप्रमाणे मालक दोषी आहे तसे सरकार देखील दोषी आहे, असे पीडितांच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे.
गाडी मालकाला अटक व्हायला हवी. यासाठी प्रशासन देखील जबाबदार आहेत. आमच्या कुटुंबियांचा आधारच गेला आहे त्यामुळे 25 पीडित कुटुंबियांतील व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी. कित्येक दिवस झाले गाडी मालकाला अटक झालेली नाही. त्याच्या गाड्या अजूनही फिरत आहेत. आमच्या घरातल्यांचा कोळसा झाला. आमच्यावर अन्याय झाला आहे. आम्हाला न्याय हवा आहे, असेही कुटुंबिय म्हणाले.