भंडाऱ्यामध्ये वाळू माफियांचा धुमाकूळ

भंडारा जिल्ह्यातील वाळू घाटावरून दिवसरात्र होणा-या वाळू उपशामुळे जनसामान्यांपासून तर शेतक-यांपर्यंत सगळेच त्रासलेत.

Updated: Sep 6, 2017, 09:57 PM IST
भंडाऱ्यामध्ये वाळू माफियांचा धुमाकूळ title=

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील वाळू घाटावरून दिवसरात्र होणा-या वाळू उपशामुळे जनसामान्यांपासून तर शेतक-यांपर्यंत सगळेच त्रासलेत. आता त्याचा दुष्परिणाम म्हणजे गावातील रस्त्याचेंही हाल झालेत. तर याबाबत स्थानिक प्रशासन गप्प का असा संतप्त सवाल ग्रामस्थ करतायत.

भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीतील वाळू ही उच्च प्रतीची असल्यामुळे नागपूरसह अन्य ठिकाणी मोठी मागणी आहे. त्यामुळे या ठिकाणी दिवसरात्र वाळू घेऊन नागपूरच्या दिशेनं जाणारे ट्रक दिसणं आता रोजचंच झालंय.

एकट्या लाखांदूर तालुक्यात तब्बल लहान-मोठे सहा वाळू घाट आहेत. या घाटांचा लिलावही झालाय. मात्र, परवानगी नसतानाही क्षमतेपेक्षा जास्त आणि जेसीबीच्या माध्यमातून वाळू कंत्राटदार वाळूचा उपसा करत असल्याचं दिसून येतंय. सततच्या वाळू उपशामुळे वैनगंगा नदीचं अस्तित्वचं धोक्यात आलंय. तर दुसरीकडे वाळू वाहतूकीमुळे अनेक गावांच्या रस्त्यांचीही चाळण झालीय.

वाळू कंत्राटदाराला घाटावरून वाळूचा उपसा करण्यासाठी जेसीबीची परवानगीही नाही. तरीही वाळू माफिया सगळे नियम धाब्यावर बसवत सर्रास वाळू उपसा करताना दिसतात. आता याप्रकरणी स्थानिक प्रशासनानं कारवाईचं आश्वासन दिलंय.

एकंदरीतच या वाळू घाटांच्या लिलावातून शासनाला महसूल प्राप्त होतोय. तरीही शासनाच्या नियमाची पायमल्ली कशी होते हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. जिल्हा प्रशासनानं आता यावर कठोर पावलं उचलण्याची गरज आहे.