दफनभूमीचा वाद पेटला, सरपंचांच्या पत्नीचा मृतदेह अंत्यसंस्काराविना पडून

मागील १८ तासांपासून गावच्या सरपंचांच्या पत्नीचा मृतदेह अंत्यसंस्काराविना पडून

Updated: Jan 27, 2020, 07:50 PM IST
दफनभूमीचा वाद पेटला, सरपंचांच्या पत्नीचा मृतदेह अंत्यसंस्काराविना पडून

सांगली : सांगलीतल्या वांगी गावात दफनभूमीच्या जागेच्या वादात मागील १८ तासांपासून गावच्या सरपंचांच्या पत्नीचा मृतदेह अंत्यसंस्काराविना पडून आहे. २६ जानेवारीला वांगी गावातील महिलेचं निधन झालं. मात्र, दफन करण्यासाठी हक्काची जागा मिळत नसल्याने त्यांचा मृतदेह अंत्यसंस्काराविना पडून आहे. तहसीलदार आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, अजूनही अंत्यसंस्काराचा विषयी निर्णय घेण्यात आलेला नाही. 

दफनभूमीच्या जागेवरून दोन समाजात वाद आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार करू दिले जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. कडेगाव तालुक्यातील वांगी तालुका येथे गट नंबर 1599 आणि 2469 मध्ये गेले 200 वर्षापासून वंश परंपरागत दफन केले जाते. तसेच सात बारा खाते उतऱ्यावरती पीक पाणी मध्ये 12 गुंडे स्मशान पड अशी नोंद आहे. परंतु शब्दाची गल्लत करून त्या हक्काच्या जागेबाबत, काही लोकांचा विरोध आहे. 

याबाबत सांगलीचे जिल्हाधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाला आदेश दिले आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाने अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही. तहसीलदार यांना आदेश दिले असून, लोकांशी चर्चा करून सामंजस्याने मार्ग काढला जाईल, आणि अंत्यसंस्कार होतील असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय.